पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावात बदली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावात बदली करण्यात आली आहे.  पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची गेल्या महिन्यात ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख असल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. यावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती.

या संबंधीत प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला अधिकार्‍यांची समिती नियुक्त करण्यात आली. तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध काही नागरिकांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. यात ज्योती देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महिला आयोगाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवालही आता प्राप्त झाला असून देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचे त्यात म्हटले आहे.

या अनुषंगाने सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी सरकारच्या वतीने देवरे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. देवरे यांची पारनेरहून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात येत आहे. हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारपदाची सूत्रे येणार असून त्या लवकरच कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.