पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही ; गिरीश महाजनांची खडसेंवर टीका

0

जळगाव : भाजपचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचेसह नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. ज्यांची ती संस्कृती आहे; तेच तशी भाषा करतात, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. ते पाचोरा येथे भाजप कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कुणाच्या जाण्याने काहीच संपत नाही, असा चिमटा त्यांनी खडसे यांना काढला. पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यावर त्यांनी नाव न घेता आपण कधीच हजार, पाचशे मतांच्या आघाडीने निवडून आलेलो नाही, असा टोला लगावला. जामनेर येथील त्यांचे परंपरागत स्पर्धक संजय गरुड यांसह ईश्वरलाल जैन यांच्यावरदेखील त्यांनी टीका केली.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी आणि शिवसैनिकांनी सोनिया गांधींची शपथ घेऊन सत्तेच्या आणा भाका घेण्याआधी बाळासाहेबांची सेना आठवावी. राज्याचे प्रमुख आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री करोना काळात घरातून बाहेर निघायला तयार नाहीत. भाषणे देऊन आणि ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे. सध्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात चापलुसी करणाऱ्या संजय राऊत यांनी ती थांबवावी. राज्यात पहिल्यांदाच निष्क्रिय आणि बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. या रामभरोसे सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणे घेणे नाही, अशीही टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे संदर्भात झालेली चूक आपण मान्य करतो. परंतु, पुढील काळात पाचोरा तालुका भाजपच्या सत्तेच्या बाबतीत जिल्ह्यत प्रथम क्रमांकावर असेल. शिंदे हेच आमदार असतील. आपण आपला शब्द खरा करतो, असेही महाजन यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे अध्यक्षस्थानी होते. प्रथम भडगाव येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.