नालेसफाईअभावी घरात घुसले पाणी

0

नाथवाड्यातील नागरिकांचा आरोप

जळगाव- शहरातील नाथवाड्यातील नाल्याची सफाई न केल्यामुळे नाल्याला पूर येवून काही घरात नाल्याचे पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मंगळवारी अतिवृष्टीमुळे नाथवाड्यातील नाल्याला पूर येवून ते पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचा संपर्क तुटला होता.

नाथवाड्यातून वाहणारा नाला हा विवेकानंद नगरातून येत असून सिंधी कॉलनी रस्त्याच्या खालून नाथवाड्यातून  हेमू कालाणी उद्यानाकडे वाहत जावून उद्यानाच्या मागील बाजूने ईश्वर कॉलनी परिसरातून पुढे जातो. नाथवाड्यात हा नाला उघडा आहे. या नाल्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून सफाई झालेली नाही. नागरिकांनी या नाल्यावरील रहिवासी नागरिकांनी नाल्यावर ढापे टाकलेले आहेत. महिनोमहिने या नाल्याची सफाई होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या नाल्याची सफाई जेसीबीद्वारे लगेचच होवू शकते. पावसाळापुर्वी नालेसफाईचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कानाडोळामुळे कालच्या पावसाने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्याचप्रमाणे साथरोगांच्या पार्श्वभूमीवर तरी त्वरित नालेसफाई व्हावी, अशी मागणी परिसरातील शंकर नाथ,  पांडुरंग जोशी, शंकर विधाते, घनश्याम जोशी, सुरेश भोई, विजय नाथ आदींसह नागरिकांनी केली आहे.

नाल्यात विद्युत खांब
नाथवाड्यातील या नाल्यात विद्युत खांब धोक्याच्या स्थितीत उभा आहे. हा खांब हटविण्याबाबत अनेकदा तक्रारी करुनही हा खांब नाल्यातून हटविण्यात आलेला नाही. या खांबाद्वारे नाला व परिसरात विद्युत प्रवाह उतरुन अनर्थ घडू शकतो. खांब केव्हावी पडू शकतो. हा खांब हटविण्यासाठी संबधित विभाग एखाद्या मोठ्या घटनेची वाट पहात आहेत काय? असा सवाल विचारला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.