नाथाभाऊ समर्थकांचा झेंडा

0

जिप सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर 
जयपाल बोदडे, ज्योती पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह उज्ज्वला माळके विजयी 

जळगाव (प्रतिनिधी) : सोमवारी ६ रोजी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. भाजपने यापूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्याने सभापतीपदीही भाजपचाच विजय होणार हे निश्चित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रमाणे महाविकास आघाडी उमेदवार दिले. मात्र, महाविकास आघाडीच्या वाट्याला पुन्हा अपयश आले.

महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव सोपा होता. मात्र भाजपचा विजय हा पक्षासाठी पराभवासमानच ठरला. कारण, सभापती निवडणुकीत पक्षाने शिक्कामोर्तब केलेल्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आणि ऐनवेळी नाराजीनाट्यातून पुढे  आलेल्यांच्या पदरी सभापतीपद पडले. नाराजी नाट्यामुळे भाजपचे गणित बिघडले. निवडणुकीत भाजपचा विजय झाला. मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवारांना माघार घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आणि अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले, आज निवड झालेले चौघे सभापती  नाथाभाऊ समर्थक मानले जात असल्याने आ.गिरीश महाजन यांना हा शह असल्याचे मानले जात आहे. अंतर्गत मतभेदामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपेक्षा भाजपला सभापतीपदाची निवडणूक अधिक त्रासदायक आणि कसोटीची ठरली.

सभापतीपदाच्या निवडीत भाजपची संख्याबळ वाढली.  सभापतीपदाची निवडणूक भाजपने २९ विरुद्ध ३५ मतांच्या फरकाने जिंकली. जयपाल बोदडे यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली गायकवाड, ज्योती पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच कल्पना कल्पना पाटील, रविंद्र पाटील यांनी काँग्रेसच्या सुरेखा पाटील, उज्ज्वला पाटील यांनी राष्ट्रवादीच्या डॉ.नीलम  पाटील यांचा पराभव केला. ६ मताच्या फरकाने भाजपचे चारही उमेदवार विजयी झालेत. भाजपने यावेळी अध्यक्षपद रावेर लोकसभा मतदारसंघाकडे तर उपाध्यक्षपदाचे  खांदेपालट करण्याचे ठरविले होते. त्यामुळे रावेर कडील एक सभापतीपद आणि उपाध्यक्ष पद जळगाव लोकसभा मतदारसंघ कडे येणार होते. मात्र निवडणुकीदरम्यान घडलेल्या नाराजीनाट्यामुळे चारही सभापतीपद रावेर लोकसभा मतदारसंघाकडे गेले. केवळ उपाध्यक्षपदावर जळगाव  लोकसभा मतदारसंघाची बोळवण करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदासह एक सभापतीपद जळगाव लोकसभा मतदारसंघाकडे देण्याचे नियोजन भाजपने केले होते.

मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. निवडणुकीनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला एकही सभापतीपद आले नाही. पाचोरा तालुक्यातील मधुकर काटे यांच्या रूपाने एक सभापतीपद मिळणार होते. मात्र ते होऊ शकले नाही. सभापती निवडीत पक्षाने जळगाव लोकसभा मतदारसंघावर अन्याय केल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकमेव चाळीसगावचे आमदार वगळता भाजपचा एकही आमदार जळगाव ग्रामीण लोकसभा मतदार संघात नाही, त्यामुळे जि.प.च्या माध्यामातून सभापतीपद देऊन पक्ष वाढीसाठी मदत झाली असती. मात्र ते नियोजन पक्षाला जमले नसल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

चोपड्याला ‘लॉटरी’
निवड झालेल्या चारपैकी तीन सभापतीपद हे चोपडा विधानसभा मतदारसंघाकडे गेले आहेत. जि.प.च्या इतिहासात प्रथमच हा चमत्कार झाला  आहे. अतिशय मिनी मंत्रालय म्हणून ग्रामिण भागासाठी महत्वाच्या असलेल्या जि.प.त सत्तेची वाटप नेहमीच समसमान केली जाते. मात्र, यावेळी सर्वच गणिते जुळून आली आणि चोपडा विधानसभा मतदार संघातील सौ.ज्योती राकेश पाटील, सौ.उज्वला प्रशांत माळके आणि रविंद्र  सूर्यभान पाटील हे तिघे जि.प.सदस्य आज जि.प.चे सभापती म्हणून विजयी झाले. निष्ठावंताना का डावलतात? असा सवाल करीत जयपाल बोदडे, रविंद्र पाटील यांनी  सभागृहातच जाब विचारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.