उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी आज मुख्यमंत्री साधणार संवाद

0

मुंबई  : राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी (दि. 7) मुंबईत संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर श्री. ठाकरे पहिल्यांदाच मोठ्या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे आयोजित या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, आदि गोदरेज, सज्जन जिंदाल, उदय कोटक, दीपक पारेख, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी आदी नामवंत उद्योगपती उपस्थित राहणार आहेत.

या संवादाच्या वेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे राज्याच्या विकासाबाबतची आपली भूमिका उद्योगपतींसमोर मांडतील. राज्याच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी राज्यातील आर्थिक क्षेत्राची सद्यस्थिती आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भातील माहिती उद्योगपतींकडून जाणून घेतली जाईल. तसेच राज्याच्या विकासाचा आराखडा बनविताना त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील प्रमुखांच्या सूचनांचा योग्य विचार केला जाणार आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. देशाच्या स्थूल उत्पन्नात (जीडीपी) राज्याचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यात उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्याला 2025 वर्षापर्यंत सहस्त्र अब्ज डॉलर (ट्रिलिअन) अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्यात येणार असून देशात राज्याचा हिस्सा एक पंचमांश इतका असणार आहे. त्यामुळे देशाच्या जीडीपी आणि एफडीआय मध्ये राज्य कायम अग्रेसर रहावे आणि ओद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जावे यासाठी सर्व क्षेत्रांच्या सहभागातून आराखडा बनविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.