नवाब मलिकांचा वानखेडेंवर धक्कादायक आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी एनसीबीचे मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक हे क्रूझ ड्रग्ज प्रकणानंतर पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला होता. एनसीबी आणि समिर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते.

दरम्यान, नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असा आरोप केला आहे. मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटसॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

मनसेचं प्रत्युत्तर

नवाब मलिक यांच्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं, असं देखील खोपकर म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.