धक्कादायक.. 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घुण हत्या

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार तसेच गुन्हे घडतांना दिसत येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथून समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार करून तिघांनी तिची हत्या केल्याचे वृत्त आहे. या क्रूर हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून या पुढील तपास सुरू आहे.

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स या ठिकाणी ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे असे मृत तरुणीचे नाव आहे. क्षितिजा नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथे आली होती. त्यावेळी 22 वर्षीय आरोपी शुभम भागवतही त्या ठिकाणी आला व त्याने क्षितिजाला बाजून घेऊन बोलायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला व काही कळायच्या आतच आरोपीने कोयत्याने क्षितिजावर वार केले.

या हल्ल्यामध्ये क्षितिजाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला. आरोपीजवळ पिस्तुल असल्याची माहितीही मिळत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की या आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या दूरच्या नातेवाईकाचे ‘एकतर्फी’ प्रेम हे निर्घृण हत्येमागील कारण असू शकते.

दरम्यान, या घटनेबाबत पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणे हे सामाजिक अध:पतनाचे गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणे हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल.’

या घटनेनंतर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ  यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आपल्या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत. यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद?” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींवरही टीकास्त्र सोडलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. “अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून, टाईप करतानाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तिने, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पोलीस कायदे कागदावर… महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद??” असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.