दादा विधानसभेची निवडणुक लढविणार

0

जळगाव, दि. 1- गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हाभरातील शिवसेना कार्यकर्त्यांची मनधरणी सफल झाली असून माजी मंत्री सुरेशदादा जैन हे विधानसभेची निवडणुक लढविणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे मनपा विरोधीपक्ष नेते डॉ. सुनिल महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक आदींची उपस्थिती होती.

माजी मंत्री सुरेशदादा जैन गेल्या 35 वर्षांपासून जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. दादांनी 2019 मधील विधानसभेची निवडणूक लढवावी. यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून त्यांची मनधरणी पदाधिकारी, कार्यकर्ते दादाप्रेमींकडून सुरु होती. सुरेशदादा आपल्या कुटुंबियांशी चर्चा करुन निर्णय देणार होतेे. त्यानुसार दादांनी शनिवारी आपला निर्णय कळविलेला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपा- सेना युतीचे उमेदवार असणार आहेत.

शहरातील गाळेधारक, हुडकोप्रश्न, विकासाचा अनुशेष भरून निघावा यासाठी  गेल्या आठ महिन्यांपासून माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेेते डॉ. सुनिल महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, महानगराध्यक्ष शरद तायडे, श्याम कोगटा, विजय वाणी, राजु अडवाणी यांच्याकडून  दादांची मनधरणी सुरु होती. त्याला खर्‍या अर्थाने यश आले असल्याचे डॉ. सुनिल महाजन व प्रशांत नाईक यांनी सांगितले.

दादांशिवाय पर्याय नाही- नितीन लढ्ढा

जळगाव शहराचा विकास साधायचा असेल तर सुरेशदादांशिवाय पर्याय नाही. आम्ही दादांशी चर्चा करुन मनधरणी केली. त्यांनी दुजोरा दिला असे लोकशाहीशी बोलताना माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले. शहराचा विकास दादांच्या संकल्पनेतूनच झाला यानंतर सत्ता हातात असूनदेखील गेल्या 11 महिन्यांपासून नगरपालिकेत, राज्यात, देशात भाजपाची सत्ता असताना त्यांना कोणत्याच प्रकारचे प्रश्न सोडविता आलेले नाही. शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील तर सुरेशदादांशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे निवडणूक लढविण्याची मानसिकता- सुरेशदादा जैन

मी परिवारात अद्याप कोणाशीही बोललो नसून कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा हट्ट व आग्रहाची भूमिका असल्याने त्यांना न्याय देण्यासाठी माझी निवडणूक लढविण्याची मानसिकता असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दै. लोकशाहीशी बोलताना सांगितले.जळगाव शहर विधानसभेची जागा ही प्रथमपासून सेनेची आहे. त्यामुळे सेना- भाजप युतीतर्फे सेना ही जागा निश्चित लढवेलच, असेही दादांनी निक्षून सांगितले.

दादा पर्वाची होवू शकते सुरुवात

सुरेशदादा निवडणूक लढविणार या बातमीने जिल्ह्याभरातील शिवसेना कार्यकर्ते, नागरिकांत उत्साह संचारला आहे. सुरेशदादांचे मन वळविण्यात सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठे यश आले आहे. दादांनी शनिवारी कळविलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असून ही दादापर्वाची नांदीच असल्याचे नागरिक, कार्यकर्त्यांत बोलले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.