जेसीएल टी 20 स्पर्धेचे रंगारंगनेे शानदार उद्घाटन!

0

पहिल्या दिवशी एम.के. वॉरियर्स व रायसोनी अचिव्हर्स विजयी : तनेश जैन व योगेश तेलंग ठरले सामनावीर

जळगाव, . दि.12 –
जेसीएल टी20 स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी शानदार उद्घाटन झाले. यावेळी अहिंसा तीर्थ रतनलाल सी. बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, रजनीकांत कोठारी, रमेशदादा जैन, जितेंद्र कोठारी, परेश झवर, प्रेम कोगटा, अमर चौधरी, किरण बच्छाव, युसुफ मकरा, अरविंद देशपांडे, अविनाश लाठी, आशिष भंडारी, श्री. खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुलवामा घटनेतील शहीदांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. पाहुणा गायक जसराज जोशी (पुणे) याच्या माँ तुझे सलाम… वंदे मातरम्ने देशभक्तीचा रंग भरला. जळगावच्या तनय मल्हारा व शुभम वानखेडेने दिलखेचक नृत्य सादर करुन मने जिंकली.
जेसीएल टी20 मालिकेच्या पहिल्या दिवशी तीन सामने खेळले गेले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये एम.के. वॉरियर्स व रायसोनी अचिव्हर्स हे संघ विजयी झाले. एम.के. वॉरीयर्सचा खेळाडू तनेश जैन व रायसोनी अचिव्हर्सचा खेळाडू योगेश तेलंग हे सामनावीराचे मानकरी ठरले. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न होणार्या जेसीएलमध्ये 17 तारखेपर्यंत रंगतदार सामन्यांची मेजवानी बघायला मिळणार आहे. जेसीएलचा पहिला विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
जेसीएलमध्ये सहा दिवसात एकूण अठरा सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या दोन सामन्यांमध्ये एम.के. वॉरियर्स व रायसोनी अचिव्हर्स या संघांनी विजयी सलामी दिली. पहिला सलामीचा सामना एम.के. वॉरियर्स व वनीरा ईगल्स यांच्यामध्ये रंगला. सुरुवातीला संघ मालक आदर्श कोठारी व किरण महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात आला. एम. के. वॉरियर्सने टॉस जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकांमध्ये त्यांनी 7 गडी गमावत 170 धावा केल्या. कर्णधार तनेश जैन याने 47 चेंडूंमध्ये 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. सौरभ सिंगने नाबाद राहात 40 चेडूंमध्ये 60 धावा केल्या. वनीरा ईगल्स तर्फे चंदन रणवे याने 4 षटकात 22 धावा देत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळतांना वनीरा ईगल्सचा संघ निर्धारीत 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 135 धावाच करु शकला. सिद्धेश देशमुखने सर्वाधिक 55 धावा केल्या. एम.के. वॉरियर्स तर्फे अंकित पटेलने 4 षटकात 15 धावा देत 4 गडी बाद केले. तनेश जैन यानेही 2 गडी टिपले. हा सामना एम.के. वॉरियर्स यांनी 35 धावांनी जिंकला. तनेश जैन हा सामनावीराचा मानकरी ठरला.
दुसरा सामना रायसोनी अचिव्हर्स व के.के. कॅन्स थंडर्स यांच्यात झाला. रायसोनी अचिव्हर्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकात 5 बाद 207 धावा केल्या. त्यात योगेश तेलंग याने 30 चेडूंमध्ये सर्वाधिक 56 धावा करत 3 चौकार व 5 षटकार खेचले. तसेच लतिकेश पाटील 42 धावा (2 चौकार व 4 षटकार), प्रतिक नन्नवरे 46 धावा (2 चौकार व 4 षटकार) करत योगदान दिले. के.के. कॅन्स थंडर्स तर्फे अक्षय शर्मा याने 4 षटकात 29 धावा देत 5 बळी टिपले. प्रत्युत्तरात खेळतांना के.के. कॅन्स थंडर्स संघाला निर्धारीत 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 133 धावा करता आल्या. प्रद्युम्न महाजनने सर्वाधिक 52 धावा (5 चौकार व 2 षटकार) केल्या. रायसोनी अचिव्हर्स तर्फे सचिन चौधरीने 3 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. अशफाक शेख व चारुदत्त नन्नवरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रायसोनी अचिव्हर्सने हा सामना 74 धावांनी जिंकला. योगेश तेलंग हा सामनावीराचा मानकरी ठरला. शेवटचे वृत्त हाती येई पर्यंत पहिल्या दिवसाचा तिसरा सामना खान्देश ब्लास्टर्स व मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स यांच्या खेळविला जाणार होता.
आज होणारे सामने
दि. 13 मार्च रोजी ही जेसीएल टी 20 मध्ये तीन सामने खेळविले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना सकाळी 9 वाजता खान्देश ब्लास्टर्स विरुद्ध स्पेक्ट्रम चॅलेंजर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. दुसरा सामना दुपारी 3 वाजता मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. तिसरा सामना सायंकाळी 7.15 वाजता वनीरा ईगल्स विरुद्ध के.के. कॅन्स थंडर्स यांच्यात रंगणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.