जेएनयू हल्ल्याची ‘हिंदू रक्षा दल’ने स्विकारली जबाबदारी

0

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघांच्या (जून्सू) पदाधिकाऱ्यांवर व विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी  हिंदू रक्षा दल या संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर ऊर्फ पिंकी चौधरी याने याची माहिती दिली. आपण हिंदू रक्षा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले आहे.  सोमवारी (6 जानेवारी) रात्री सोशल मीडियावर पिंकी चौधरींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये ते म्हणाले, जो कोणी देशविरोधी काम करतील त्यांना जेएनयूच्या विद्यार्थ्य़ांप्रमाणे परिणाम भोगावे लागतील, असेही त्या व्हिडिओत म्हटलं आहे. पिंकी चौधरींवर यापूर्वीही आप कार्यालयावर हल्लासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत, यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जवाहर लाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात रविवारी (5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला तोंड झाकलेल्या हल्लेखोरांच्या हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या होत्या. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. याव्यतिरिक्त 40 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले आहेत. यात 30 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांचा समावेश आहे. जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

व्हायरल व्हिडिओत चौधरीने विद्यापीठातील कृत्याची जबाबदारी स्विकारली आहे. त्याविषयी बोलताना, जे कोणी लोक देशविरोधी कृत्ये करतील त्याचा परिणाम जेएनयूतील विद्यार्थ्य्यांप्रमाणे असेल. जेएनयूत रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आमच्या धर्माविरोधात इतकं चुकीचं बोलणं योग्य नाही. अनेक वर्षांपासून जेएनयू कम्युनिस्टांचा अड्डा बनला असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. चौधरीने यात दावा केला आहे की, जेएनयूमध्ये रविवारी जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये सर्वजण हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.