जळगांव जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांना 474 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ

0

 

  •  जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 577 शेतकरी कुटूंबांनी कर्जमाफीसाठी भरले होते ऑनलाईन अर्ज.
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने 1 लाख 50 हजार कर्जमाफीच्या अर्जांची छपाई करण्यात आली होती.
  • 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतक-यांना दिड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दिड लाख रुपयांवरील  शेतक-यांना एकवेळ समझोता योजना लागू.
  •  कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे अशा शेतक-यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित.
  •  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगांव जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतक-यांना 474 कोटीं रुपयांची कर्जमाफी रक्कमेचा लाभ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.
  •  3 हजार शेतक-यांच्या मोबाईलवर कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करण्यात आल्याचे एसएमएस पाठविले.
  •  राष्ट्र्रीयकृत बँकांच्या अंदाजे 1 लाख लाभार्थ्यांना 100 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार.
  •  दिड लाख रुपयांवरील रक्कम संबंधीत जिल्हा बँकेच्या शाखेकडे 31 मार्च, 2018 च्या आत जमा करण्याचे आवाहन.
  •  प्राप्त झालेल्या निधीचे 100 टक्के वाटप करणारी जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली बँक ठरली.

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांना 474 कोटी रुपये रक्कमेचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली आहे.सन 2012 ते 2016 या चार वर्षात जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने जिल्हयातील अनेक गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती. त्याचदरम्यान जिल्ह्यातील काही भागात गारपीट व अवेळी पाऊस पडल्याने शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी घेतलेले पीककर्ज परत फेडू शकले नाही. याचा परिणाम शेतकरी थकबाकीदार झाले होते. त्यामुळे हे शेतकरी नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र ठरु शकत नव्हते. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने अशा थकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहिर केला होता. मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील शेतक-यांसाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 जाहिर केली. या योजनेतंर्गत जळगांव जिल्ह्यात 2 लाख 43 हजार 577 शेतकरी कुटूंबांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने 1 लाख 50 हजार कर्जमाफीच्या अर्जांची छपाई करून घेतली होती.  या अर्जांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्ह्यातील  सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, तसेच स्थानिक ग्रामपंचायत आदि ठिकाणी वाटप करण्यात आले होते. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या बाबतीतही जळगांव जिल्हा राज्यात आघाडीवर होता. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फन्समध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याचा स्पष्ट उल्लेख करुन जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे त्यावेळी कौतूकही केले होते. राज्य शासनाने शेतक-यांसाठी जाहिर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतक-यांना दिड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दिड लाख रुपयांवरील शेतक-यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. तसेच सन 2015-2016, 2016-2017 वर्षात ज्या शेतक-यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे. अशा शेतक-यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. सन 2009-2010 ते 2015-2016 या कालावधीत कर्जाचे पुर्नगठण केलेले शेतक-यांपैकी जे शेतकरी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असतील त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या जळगांव जिल्ह्यातील थकबाकीदार शेतक-यांनी राज्य शासनाने पुरविलेल्या स्तंभ क्र. 1 ते 66 नमुन्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगांव जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतक-यांना 474 कोटी रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत मिळालेली आहे. याबाबत आजपर्यंत सुमारे 3 हजार शेतक-यांना, या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर पाठवून कळविण्यात आले आहे. तसेच राष्ट्र्रीयकृत बँकांच्या अंदाजे 1 लाख लाभार्थ्यांना 100 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही श्री जाधवर यांनी म्हटले आहे. जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्राप्त झालेल्या निधीचे 100 टक्के वाटप करणारी जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली बँक ठरली आहे. ‍जिल्हा बँकेस प्राप्त असलेला निधी जळगांव जिल्ह्यातील लाभार्थी शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आला आहे.  तसेच जळगांव जिल्ह्यातील सर्व दिड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एक वेळ समझोता योजनेतंर्गत (OTS) दिड लाख रुपयांवरील रक्कम संबंधीत जिल्हा बँकेच्या शाखेकडे 31 मार्च, 2018 च्या आत जमा करणेबाबत कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेकडून व इतर बँकेकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दिड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी राज्य शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत संबंधीत बँकेत रकमेचा भरणा करुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.