घंटागाड्यांचा दुरुस्ती, शासकीय कर वॉटरग्रेसकडून वसूल करावा, मालमत्तांचे फेरमूल्यांकन रद्द करावे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहर महानगरपालिकेने वॉटरग्रेस कंपनीला संपूर्ण जळगावचा सफाईचा ठेका दिलेला असुन कचरा संकलन करण्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या 143 नव्या घंटागाड्या विनामूल्य उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. धुळे महानगरपालिकेने याच कंपनीला धुळे महानगरपालिकेच्या मालकीची वाहने किलोमीटर दरानुसार भाडेतत्त्वावर दिलेली आहेत.

अर्थतातच जळगाव महानगरपालिकेने जनतेच्या व शासनाच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. एवढे सर्व बेकायदेशीरपणे घडत असताना गेल्या दोन वर्षापासून सर्व वाहनांचा सर्विसिंग कालावधी सुध्दा निघून गेलेला असल्याने व दोन वर्षात कंपनीकडून करण्यात येणारी मोफत सर्विसिंग कालावधी देखील निघून गेलेला असल्याने, आता रोखीने सर्विसिंग करण्यासाठी एक कोटी रुपयांचा भुदंड बसणार आहे, हा भुदंड मनपाच्या माथी मारण्याचा मनसुबा वॉटरग्रेस कंपनीचा आहे.

आजपर्यंत 40 ते 50 वाहने नादुरुस्त आहेत पण वॉटरग्रेस ते दुरुस्त करण्यासाठी कानाडोळा करीत असल्याने कचरा संकलन व वाहतुकीला अडचण होत आहे.  हा बोजा देखील जळगाव महानगरपालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. सदर वाहनांच्या फिटनेस संदर्भातही वॉटरग्रेसने कोणतीही दखल घेतलेली नसल्याने मनपा प्रशासन वाहनांच्या फिटनेसचा खर्च देखील करत आहे.

वास्तविक हा खर्च मक्तेदारावर पडला पाहिजे व मनपाने आदेशित करून त्याच्या बिलातून ही रक्कम वसूल केली पाहिजे. मुदत संपल्याने RTO  विभागाकडून काही वाहनांवर जप्तीची कारवाई केलेली आहे. परंतु अशा वाहनांमुळे जीवित हानी झाल्यास मनपावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, याकरिता मनपा प्रशासनाने मक्तेदाराला कायदेशीर नोटीस देऊन वाहन दुरुस्ती करावी व योग्यता प्रमाणपत्र करिता येणारा सर्व खर्च वॉटरग्रेस कडून वसूल करावा.

तसेच तीन वर्षांपूर्वी शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करणेकामी जळगाव शहर महानगरपालिकेने अमरावती येथील एजन्सीला जबाबदारी सोपवली होती. सदर कंपनीने लेझर गन द्वारे मालमत्तांचे फेरमूल्यांकन केलेले आहे. तसेच सदर कंपनीने लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दडपणात येऊन व आमिषाला बळी पडून धनदांडग्यांना मालमत्ता सर्वेक्षणामध्ये सोयीनुसार व आर्थिक बोजा पडू नये या पद्धतीने सूट दिलेली आहे.

अशाप्रकारे मालमत्ता फेरमुल्यांकन करतांना लेझर गन वापरणे व अनेक बेकायदेशीर बाबी घडलेल्या आहेत. त्यामुळे  जळगाव शहरातील मालमत्तांचे झालेले बेकायदेशीर फेरमूल्यांकन रद्द करण्यात यावे आणि जळगाव शहरातील नागरिकांवर पडलेला आर्थिक बोजा रद्द करण्यात यावा.

या दोन्ही मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगर तर्फे आयुक्त सतिष कुलकर्णी व महापौर जयश्रीताई महाजन यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक राजू मोरे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुशील शिंदे, रहीम तडवी, विशाल देशमुख, किरण चव्हाण, राहुल टोके आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.