गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

0

पणजी :- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपा, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष आमदारांशी चर्चा करण्यात आली होती. ज्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

”पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून मी ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,” असे प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर सांगितले. तसेच यावेळी आपल्या कारकीर्दीचे श्रेय सावंत यांनी मनोहर पर्रीकर यांना दिले. ”मी आज जो काही आहे तो मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच आहे. मनोहर पर्रीकर हे मला राजकारणात घेऊन आले होते. त्यामुळे मी गोवा विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले तसेच आज माझी मुख्यमंत्रिपदी निवड झाली ती पर्रीकर यांच्यामुळेच झाली आहे.”असे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब-याच चर्चेनंतर तयार झाला.

तत्पूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला. विरोधी पक्षनेता चंद्रकांत कावळेलकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व १४ आमदार राजभवनात गेले आणि सिन्हा यांना निवेदन देत त्यांचा पक्ष विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असून आम्हाला सरकार बनवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.