खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणात त्रयस्थ अर्ज न्यायालयात मंजूर

0

पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात त्रयस्थ अर्जदाराचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) या प्रकरणात खडसे यांना क्‍लीनचीट दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात दीड वर्षापूर्वी अर्ज दाखल केला होता. विशेष सत्र न्यायाधीश एस. आर.नावंदर यांच्या न्यायालयाने संबंधित अर्ज मंजूर केला. याची पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे.

ऍड. सरोदे म्हणाले, एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करत भोसरी येथील जमीन पत्नी आणि जावई यांच्या नावे विकत घेतली. त्याकरिता कोट्यवधींचा व्यवहार एका दिवसात झाला असून याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. या केसमध्ये दमानिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

खडसे यांच्याविरोधात पुरावे असतानाही त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कशाप्रकारे क्‍लीनचिट दिली, ही बाब पुराव्यानिशी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. या प्रकरणात आमचीही बाजू न्यायालयाने सुनावणीदरम्यान ऐकून घ्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, मागील दीड वर्षापासून याबाबत केवळ तारखा पडल्या असून न्यायाधीशांच्या बदली होऊन ही आमचा अर्ज मान्य झाला नव्हता. न्यायालयाने याबाबत आमचा अर्ज आणि एसीबीने कशाप्रकारे खडसे यांना क्‍लीनचिट दिली याचे कागदपत्रे पाहत अर्ज मंजूर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.