खडसेंच्या पदरी पुन्हा निराशा, भाजपचे चार उमेदवार जाहीर

0

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. दरम्यान, विधानपरिषदेसाठी चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांना पक्षानं पुन्हा संधी नाकारली आहे. त्याचबरोबर भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारल्याचं चित्र आहे.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे नवव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चुरस आहे. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीपेक्षा कमी मतांची गरज आहे. मतदान गुप्त असल्याने भाजप चौथी जागा लढविण्यावर ठाम असून आम्हाला चार जागा सोडल्या तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपनेत्यांचे मत आहे. यानुसार भाजपने चार उमेदवारीही जाहीर केल्याने चुरस वाढणार हे मात्र निश्चित झालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.