खडसेंची ताकद दाखवण्यास सुरुवात ; भाजपच्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी जास्त

0

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे यांनी हळूहळू ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा, खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

 

एकनाथ खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल होती. ही कार्यकर्त्यांची संख्या भाजपच्या पक्षबांधणीसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा, जास्त होती असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे.

 

जळगावातील मुक्ताईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर भाजपाची ही पहिलीच पक्षबांधणीची बैठक होती. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात मुक्ताईनगर भुसावळ, रावेर, या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. मात्र या बैठकांमध्ये स्थानिक तुरळक कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही याठिकाणी पाठ फिरवली होती.

 

काही दिवसापूर्वी गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या जाण्याने भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचे म्हणाले होते. मात्र भाजपने बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा, खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. मुंबईला महत्त्वाचं काम निघाल्यामुळे गिरीश महाजन यांना बैठकीला उपस्थित राहता आलं नसल्याचं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. या बैठकीला बहुतांश कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचंही दिसून आलं.

 

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आता दाखल झाले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला खानदेशात पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकंदरीत खडसेंची नाराजी दूर करण्यात भाजपाला जे अपयश आलं, त्याचा सामना प्रत्येक निवडणुकीत भाजपाला करावा लागणार आहे. हे आव्हान आता गिरीश महाजन यांना पेलावं लागणार आहे. गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यात भाजपा वाढवतात किंवा आहे तेवढ्या जागा टिकवून ठेवतात हे पुढील निवडणुकांमध्येचं समजू शकणार आहे.

 

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.