कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर ; योग्य उपचार न मिळाल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

0

जळगाव (प्रतिनिधी) : कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. १२ दिवसांपूर्वी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या ६५ वर्षीय वृद्धास आयसीयूची गरज असतांना जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू राहिल्याने अखेर वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत वृद्धाच्या नातेवाइकांनी कोविड रुग्णालयाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे कोविड रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी आता करण्यात येत आहे.

याबाबत अधिक असे की, शहरातील शिवाजीनगर भागातील एका ६५ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना १२ दिवसांपूर्वी सिव्हील हॉस्पीटलमधील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात जनरल वॉर्डात उपचार सुरू होते. वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना आयसीयूत हलवणे गरजेचे असताना हलगर्जीपणा करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, वृद्धाच्या प्रकृतीविषयी माहिती विचारून देखील रुग्णालयातील डॉक्टर्स माहिती देत नव्हते.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी वृद्धाच्या नातेवाईकांना फोनवरून त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, या नंतरही संबंधीत रूग्णावर जनरल वॉर्डातच उपचार करण्यात आले. तर नातेवाईकांना याबाबत कोणताही माहिती देण्यात आली नाही. यानंतर त्यांना थेट मृत्यूची बातमी मिळाली.

हा सर्व प्रकार सुरू असतांना मंगळवारी रात्री कोविड रुग्णालयातून नातेवाईकांना थेट वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. यामुळे रूग्णाच्या आप्तांना प्रचंड धक्का बसला. या घटनेनंतर मृत वृद्धाच्या नातेवाइकांनी कोविड रुग्णालयाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येण्यास नकार दिला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव पसरला.

Leave A Reply

Your email address will not be published.