कोरोना योध्द्यांना वाऱ्यावर सोडू नका

0

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि लाटेत विशेषत: पहिल्या लाटेत कोरोनामुळे रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांजवळ डॉक्टर – परिचारिका व्यतिरिक्त कोणीही जात नव्हते. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना पाझेटीव्ह अहवाल आला रे आला की त्या कोरोनामुक्त रूग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सुध्दा घरातील एका वृध्दाला कोरोनाची लागण झाली असे समजताच अथवा त्याचा कोरोना अहवाल पाझेटिव्ह आल्याचे कळताच त्या कोरोनाग्रस्ताला पहिल्यांदा कुटुंबापासून दूर केले जायचे. त्या कोरोनाग्रस्त रूग्णाला घरातील एकही व्यक्ती हातसुध्दा लावत नसत. कोवीड सेंटर अथवा कोवीड रूग्णालयाला फोन करून ॲम्बुलन्स मागविण्यात येत असे. ॲम्बुलन्समध्ये आलेल्या तोकडा एक – दोन जणांचा स्टाफ असायचा. त्या स्टाफमार्फत त्या कोरोनाग्रस्त रूग्णाला उचलून ॲम्बुलन्समध्ये ठेवण्यात येत असे. कोवीड रूग्णालयात कोरोना रूग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका अथवा वॉर्ड बॉय हे स्पेशल किट घालून उपचार करीत असत. एवढी सुरक्षेची काळजी घेऊनसुध्दा कोरोना रूग्णालयात रूग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टर, परिचारिकांचा मृत्यू झाला. रूग्णालय परिसरात ड्युटी करणाऱ्या पोलिस खात्यातील कर्मचारी – अधिकाऱ्यांना सुध्दा लागण झाली. त्यात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा सुध्दा मृत्यू झाला. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोना या रोगाविषय जनमानसात कमालीची भीती पसरली होती.

सुरूवातीच्या काळात प्लॉस्टिक किटसुध्दा उपलब्ध नव्हते. पाहिजे तेवढे किट नसल्याने डॉक्टरांचे अक्षरश: हाल झाले. शासकीय यंत्रणेत त्याचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी या किट मोफत दिल्या.ही झाली कोवीड रूग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची समस्या. एका घरात एका व्यक्तिला कोरोनाची लक्षणे दिसायला लागली की त्याची कोरोना चाचणी घेतली जायची. त्या कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी आठ दिवस लागायचे दरम्यान त्या रूग्णावर अंदाजे उपचार केले जायचे. त्या रूग्णांचा कोरोना चाचणी अहवाल येण्याच्या आधीच त्याचा मृत्यू व्हायचा. त्याचा मृत्यू नैसर्गिक समजून नातेवाईकांच्या ताब्यात दिला जायचा. अंत्ययात्रेला गर्दीचा उच्चांक असायचा आणि त्यातून कोरोनोची घाऊक लागण व्हायची. पुन्हा तोच प्रश्न कोरोना चाचणीचा अहवाल नाशिक व औरंगाबादहून मागविला जात असल्यामुळे तो अहवाल यायला उशिर व्हायचा. हे त्रांगडे टाळण्यासाठी जळगाव येथे चाचणी अहवाल केंद्र सुरु झाले आणि हा तिढा सुटला. आपली आरोग्य यंत्रणा सज्ज नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. कोरोनामुळे मरण पावलेल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही अनेक अडचणी येत अनेकांच्या जिवावर उदार होऊन कोरोनामुळे मृतावर अंत्यसंस्कार करायचे. हा सर्व प्रकार मनसुन्न करणारा होता. कोणीही घरचे जवळचे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहत नव्हते. कारण कोरोनाची लागण होईल ही भिती मनात घर करून बसली होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना योध्दा म्हणून ज्यांनी ज्यांनी भूमिका पार पाडली. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच होणार आहे. जिवावर उदार होऊन त्यांनी आपली योध्दाची भूमिका बजावली आहे. त्या काळात या कारोना योध्दाचे मोल कळले. त्यांची सेवा पैशाने मोजता येणारी नाही. म्हणून कोरोना योध्दा म्हणून ज्या ज्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांना आता वाऱ्यावर सोडून देऊ नका. गरज सरो आणि वैद्य मरो अशी म्हण आहे. त्या म्हणीचा प्रयत्न येता कामा नये. किंवा आजच्या आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर युज ॲन्ड थ्रो सारखा प्रचार होता कामा नये. कोरोना योध्दांच्या संदर्भात अशी जर आपली म्हण अथवा प्रशासनाची भूमिका युज ॲन्ड थ्रोची असता कामा नये तसे असेल तर यापुढे कोणी पुढे होऊन मदत कार्य करण्यास धजावणार नाही. म्हणून कोरोना योध्दांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्याच्या दृष्टीने जे जे शक्य असेल तर ते करावे. त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेणे शक्य नसेल तर जे जे शक्य होईल ते करावे असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणावे कोरोनाच्या दोन्ही लाटेत योध्दा म्हणून जी भूमिका पार पाडली गेली त्याचे काही समान निकष लागू करावेत. त्या निकषासाइी जे जे पात्र ठरतील त्यांना जे काही सहकार्य शासनाला करणे शक्य असेल तसे नियम अथवा मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत. त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये जो बसतील आणि त्यापोठी त्यांना जे काही देणे शक्य आहे ते द्यावे. म्हणजे यापुढे अशा नैसर्गिक आपत्ती येतील. त्या आपत्तीत तोंड देण्यासाठी अशी योध्दे पुढे सरसावतील. म्हणून जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे जी यादी पाठवतील ती ग्राह्य मानून त्यांना त्याचा लाभ दिला तर भविष्यात शासनाला अडचण येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.