केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

0

कोर्टाने दिली तंबी – सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी सह अटी शर्तींवर दिलासा

महाड(रायगड)- मुख्यमंत्री ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यामुळे अटक झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला त्यांना जामीन मंजूर केला आहे. राणे यांना संगमेश्वर इथे ताब्यात घेऊन रायगड जिल्ह्यातील महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महाडच्या  कोर्टात न्यायाधीश पाटील यांच्या कोर्टापुढे ना. राणेंना हजर करण्यात आले.

राणे हे जबाबदार पदावरील व्यक्ती असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बेजबाबदार असे वक्तव्य केले आहेत., या त्यांच्या वक्तव्या मागे कुठला कट आहे का, यासाठी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील भूषण साळवी यांनी केली. त्यांना पोलीस कोठडी न दिल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, ते पुन्हा असे भडक वक्तव्य करू शकतात असा युक्तिवाद करण्यात आला.

 राणेंच्या वकिलांनी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कलमे लावून खोटा गुन्हा दाखल कसा दाखल केला आहे. हे कोर्टाच्या लक्षात आणून दिले. राणेंचे वक्तव्य हे राजकीय आहे, त्यात कसला कट असण्याचे कारण नाही तसेच या प्रकरणात कुठलाही मुद्देमाल जप्त करावयाचा नाही. तसेच त्यांचे वय आणि त्यांना ब्लड प्रेशर, शुगर असे शारीरिक त्रास आहेत, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी न देता जामीन मिळावा अशी मागणी केली.

दोन्ही युक्तिवाद ऐकल्या नंतर न्यायाधीश पाटील यांनी राणेंना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणेंच्या वकिलांनी तात्काळ तिथल्या तिथं जामिनासाठी अर्ज केला, न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या वयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला, मात्र हा जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती दिल्या. त्या पुढील प्रमाणे–

  • पुन्हा असे आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही
  • आवाजाचे नमुने पोलिसांनी मागणी केल्यावर द्यावे लागतील
  • येत्या सोमवारी(३० ऑगस्ट) आणि पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी(१३ सप्टेंबर)ला रायगड पोलीस मुख्यालयात गुन्हे शाखेसमोर हजेरी द्यावी लागेल
  • साक्षीदारांवर दबाव आणणार नाही

न्यायालया बाहेर पडताना राणेंनी माध्यमांशी संवाद साधला नाही. ते थेट मुंबई कडे रवाना झाले असून उद्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर गुरुवार पासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा राणेंच्याच नेतृत्वाखाली सुरू राहील अशी माहिती दरेकर यांनी दिली. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही प्रतिक्रिया देताना सिंधुदुर्गात पोलिसांनी लावलेली जमावबंदी मागे घ्यावी, जमावबंदी मागे जरी घेतली गेली नाही तरी जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील असे स्पष्ट केलेय.

पंधरा हजार रुपयांचा जात मुचालका आणि अटींवर नारायण राणेंना जामीन मंजूर होताच न्यायल्याबाहेर उपस्थित राणे समर्थकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. मात्र कोर्ट परिसर असल्याने घोषणाबाजी झाली नाही. राणें सोबत त्यांची पत्नी नीलम राणे, पुत्र नितेश आणि निलेश राणे न्यायालयात उपस्थित होते. त्याच बरोबर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रवीण जठार आदी भाजप नेते उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.