कृष्णा-पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी.. जाणून घ्या इतिहास आणि आख्ययिका

0

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

इ.स. १४२२-१४३५ या १२ वर्षाच्या कालावधीत कृष्णा-पंचगंगा संगम हे अत्यंत रमणीय स्थान होते. औदुंबर, शमी, वड, बेल, पळस, चंदन, साल, देवनार खैर, रुई अशा दव वृक्षांची येथे दाटी होती. लोकवस्ति फारशी नव्हतीच. प. प. रामचंद्र योगी व इतर काही योगी तापचरणासाठी येथे येऊन राहिले होते. कृष्णेच्या पूर्वतीरावर अमरापूर व त्याच्या दक्षिणेस अडीच-तीन मैलावर आलास नावाचे एक गाव आहे. या गावात अनेक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांची अनेक घरे होती. या पंच क्रोशीत कुरुंदवाड, शिरोळ अमरापूर अशी गावे होती. ब्रम्हवृदांचे येथे येणे जाणे होते.

आलास मध्ये भैरवभट्ट नावाचे वृद्ध ब्राम्हण रहात होते. ते वेद शास्त्र संपन्न व सदाचारी होते. त्यांची पत्नीही अत्यंत सुशील गुणावती व पतिव्रता होती. पती हाच देव गुरु व सर्वकाही अशी तिची भावना होती. परस्परांवर नितांत प्रेम होते. घर खऱ्या अर्थाने एक मंदिराचं होते. पण दुर्भाग्यावश हे दाम्पत्य अपत्यहीन होते. ते एकमेकांची खूप काळजी घेत. पंचक्रोशीत भैरवभट्टाना खूप मान सन्मान होता. आलास, अमरापूर, गोपुर, शिरोळ, कुरुंदवाड या गावात ते पौरोहित्य करीत असत. शिरोळला अमरेश्वरतळी दर्शन घेत. कृष्णा नदी येथे ओलांडून पंचगंगेच्या काठाने शिरोळला जात. पावसाळ्यात गंगानुज नावेतून त्यांना कृष्णा पार करून देत असे. एकेदिवशी शिरोळला जाताना अमरेश्वरी दर्शन घेतल्यावर संगमतीरावर असलेल्या अश्वत्थ वृक्षाचेतळी बसलेले एक तेजपुंज संन्यासी बसलेले दिसले. त्या दिव्य मूर्तीस पाहून भैरव भटजींचे हात अनाहूत पणे जोडले गेले. नदी ओलांडून ते पश्चिम तीरावर पोहोचले व त्या महात्म्यांचे अतिशय जवळून दर्शन झाले. भगवी वस्त्रे, रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर त्रिपुंड्र (भस्माचे) लावलेल्या त्या दिव्य मूर्तीकडे पाहून भैरव भट्ट मंत्रमुग्ध झाले.

औदुंबर तळवटी बसलेली दिव्यामुर्ती म्हणजेच साक्षात नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. भैरव भट्टानी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामी उच्चरिले ‘नारायण’. भैरव भट्ट शिरोळला गेले व येताना पुन्हा त्यांनी स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. आणि घरी जाऊन आपल्या धर्मपत्नीस ते स्वामींचे वर्णनच करीत राहिले. हा नित्यक्रमच चालू झाला त्यांना त्या यातीराजांच्या दर्शनाची ओढच लागली.

श्री गुरूंच्या ‘नारायण’ या प्रसन्न शब्द व्यतिरिक्त कोणतेही संभाषण झालेच नाही. एकदा शिरोळहुन परतताना संध्याकाळ झालेली होती. भटजी यतीराजांचे दर्शनास थांबले. यतीराज त्यावेळी सायंसंध्या करीत होते. भटजींनीही संध्या केली.जवळच बसलेल्या आसनस्थ यातीराजांना नमस्कार केला व लगबघिने घराकडे निघाले तेव्हा स्वामीजी म्हणाले, “अंधार होऊ लागला आहे व आपलेही बरेच वय झाले आहे, अशा दुर्गम रानावनातून एकटे जाणे बरे नव्हे आज येथेच राहावे व सकाळी जावे.” भैरव भट्टांची द्विधा मनस्थिती झाली घरी पत्नी एकटीच, पण या परमेश्वर सदृश सत्पुरुषाने राहण्यास सांगितले. यांची मधुर वाणी देव दुर्लभ सहवास हे अव्हेरून जाणे बरे नव्हे. म्हणून राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

स्वामींनी त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला. तेव्हा भटजी म्हणाले,” आम्ही आलास गावाचे देशस्थ ब्राम्हण गोत्र भारद्वाज. वडील वेदोनारायण होते. घरानाजीकच विश्वेश्वराचे मंदिर जे श्रीमद शंकराचार्यांनी स्थापिलेले आहे.  तेथे नित्यपूजन व रुद्रापाठ करतो. जगदंबा एकविरा हि कुलदेवी आहे. मी पंचक्रोशीत पौरोहित्य करतो. पत्नी सत्शील व सदाचरणी आहे. पण आम्हांस अपत्य नाही. आता मी वृद्ध झालो आणि पत्नीनेही साठी ओलांडली. आर्थिक परिस्थिती बेताची पण एकविरा मातेच्या कृपेने अन्नोदक कधीही कमी पडले नाही. घरी अग्निहोत्र आहे. त्यामुळे तिर्थ यात्रा केल्या नाही. आपले दर्शन झाल्या पासून सर्व तीर्थे हात जोडून उभी आहेत.

आपला नारायण हा शब्द ऐकून मनाला उभारी वाटते, प्रसन्न वाटते, म्हातारपण व्याधी व मृत्यूचेही भय वाटत नाही. श्रीगुरुंनी कृपाकटाक्ष टाकला व म्हणाले, “आमच्या बद्दल एवढी श्रद्धा वाटते मग संगमावरच राहायला या ना!” हे वाक्य ऐकले आणि भटजी गोंधळले. स्वामी महाराज अलौकिक त्रिकालज्ञानी दैवी पुरुष आहेत हे भटजींना पटलेले पण काय बोलावे हेच कळेना. श्री गुरूंनी हि अवस्था ओळखली आणि म्हणाले, “या तापोभूमीत येऊन आम्हास १२ वर्षे लोटली. आता दुसऱ्या स्थानी जायचे आहे. तथापि या स्थानाचा लौकिक इथून पुढे वाढतच जाणार आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या मनोरथ पूर्ण करण्यास पादुकांचे रूपाने आम्ही येथे कायम राहणार आहोत. तेव्हा या पादुकांचे नित्य पूजन अर्चन कारण्यासाठो वेदशास्त्र संपन्न व सदाचारी ब्राम्हण आवश्यक आहे.

तुमचा श्रद्धाभाव पाहून आम्ही प्रसन्न आहोत. तेव्हा आपणच सहकुटुंब येथे येऊन राहावे असे आम्हाला वाटते.” भटजी चांगलेच गांगरले, मनात विचार आला निर्जन वनात राहायचे, ना शेजारी ना लोकवस्ती, जवळच्या गावातूनही येणाऱ्यांची वर्दळ कमीच, दिवस जाईल पण रात्री कसा निभाव लागायचा? उदरभरणं कसे होणार? सर्व परिस्थिती ओळखून मी येथे राहण्यास आलो तरीही पत्नीला हे जमेल काय? दुखलं खुपल तर वैद्य कोठे? कृष्णा पंचगंगा दुथडी वहात असताना कोठे जायचे? काय करायचे? अशा अनेक विचारांनी भैरवभटांचे मनात काहूर केले. तरीही थोडेशे धारिष्ट करून श्रीगुरुना म्हणाले, “महाराज माझे जन्मोजन्मीचे भाग्य म्हणूनच श्रीपादुकांची सेवेची संधी मला मिळतेय. पण या निर्जन ठिकाणी तर पत्नीशी विचारविनिमय करावा असे वाटते. तिची तयारी असेल तर आनंदाने मी येथे राहायला येईल.” स्मित वदनाने महाराजांनी त्यास मान्यता दिली. थोडयाशा अपराधी पणाने भारावलेल्या अवस्थेत भैरवभटानी स्वामींचे चरणयुगल घट्ट पकडले. केव्हढा हा विलक्षण प्रसंग देवादिकानाही  भटजींचा हेवा वाटला असेल. पण भटजी त्याच अवस्थेत निद्रिस्थ  झाले.

इकडे आलास मध्ये भटजींची पत्नी त्यांचे वाटेकडे डोळे लावून बसली होती. नेहमी सूर्यास्तापूर्वी येणारे पती काळोख झालातरी अजून आले कसे नाहीत? घरातील अग्निहोत्र पत्नीने शास्त्रार्थानुसार हवन यजन केले. आणि पतीची वाट पाहत राहिली. साध्वीच्या मनाची तगमग होऊ लागली. मनात अनेक विचार येऊ लागले. यांचे वय झाले, दग दग आता सोसत नाही, आज एकादशीचा उपवास, रस्त्यात चक्कर तर आली नसेल ना? उपरण्याशिवाय यांचेकडे काहीच नाही. मध्यरात्र झाली काहीच सुचेना देवघरात येऊन एकविरा मातेला हळद कुंकू वाहिले व करुणा भाकू लागली “मातें जीवाची तगमग होतेय.

निर्जन वाटेवर यांना काही संकट तर आले नासेलना? आता तूच त्यांचे रक्षण कर. तू आमची कुलदेवता आहेस. आमचे रक्षणाची जबाबदारी माते तुझीच आहे.!” तळमळीने प्रार्थना करतानाच त्या साध्वीला ग्लानी आली व ती देवाघरातच पडून राहिली. त्या आवस्थेतच माता एकविरा प्रगटली व म्हणाली, “हे साध्वी चिंता करू नकोस. कृष्णा-पंचगंगेच्या संगांतीरावरील स्वामी महाराजांचे सानिध्यात तुझे सौभाग्य सुरक्षित आहे. तुमचा उभयतांच्या आचार आणि श्रद्धा यामुळे श्रीगुरु प्रसन्न आहेत. तुमच्यावर त्यांची कृपा होणार आहे. तुझ्या सोबतीसाठी मी आलेली आहे, आता तू काळजी करू नकोस.

“प्रसन्न मुद्रा, कपाळावरील कुंकूम तिलक, नाजूक सुवर्ण मंगळसूत्र, पायातील रुणझुण नुपुरे आणि मंजुळ शब्द यांनी ती साध्वी सुखावली. त्या आवस्थेतच यति महाराजांचे चरणी निद्रिस्थ भैरव भटजी दिसले. या आनंदात किती काळ गेला हे साध्वीला समजलेच नाही आणि भगवती एकविरा व संगमावरील यतीराजांचे रूप पुन्हापुन्हा आठवत होते. घरात सुगंध पसरला परासदारीचे प्राजक्त, सोनचाफा, जाई जुईचे वकृष्णाकमल फुलांनी आज डवरून गेले. केवढे हे भाग्य! ब्राम्ह मुहूर्तावर स्वामी महाराज स्नाना साठी निघाले. भैरव भटजीही निघाले आणि स्वामी महाराजांचे अंगावरून येणाऱ्या जलप्रवाहात स्नान करून कृतकृत्य झाले. स्नानसंध्येनंतर स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन आपल्या घराकडे मार्गस्थ झाले.

भटजी घरी आले आता दोघांनाही आपले दिव्या अनुभव एकमेकांना सांगायचे होते. दोघांनाही दिव्या अनुभूती झाली होती साध्वीने भटजींना गरम फुलपात्र भरून दूध दिले तेव्हा भटजी म्हणाले “काल त्या यातीराजांचे येथे त्यांनी आम्हास ठेऊन घेतले आपणास चिंता वाटली असेलना?” त्यावर पत्नी म्हणाली “मला सर्व ठाऊक आहे. प्रथम आपण आन्हिक उरकून घ्या मग बोलू” भैरवभट चकित झाले पण स्वामींची मूर्ती त्यांचे डोळ्यासमोरून हालतच नव्हती.

पुजाकर्माबरोबर श्रीसूक्त, रुद्र, व पवमान पठानंतर गोग्रास, वैश्वदेव व काकबलीझाला अतिथीची वाट पाहता एक जटाधारी योगी दिसले. त्यांना सामोरे जाऊन भटजींनी बोलावले पाद्य दिले. त्यांना अन्न भोजनाची विनंती केली. शाक पाकादी भोजन वाढले, प्रार्थना केली महाराज आपण भोजन करावे. जगतपालक श्री नृसिह सरस्वतीच रूप पालटून आलेले, तृप्त झाले. भोजनानंतर भैरवानी यतींना दर्भाची चटई घालून विश्रांती घेण्यास सांगितले. आतल्या घरात दाम्पत्याचे बोलणे चालू होते. भटजी स्वामी महाराजांचे वर्णन करीत असता भारावून सांगत होते तर पत्नी म्हणाली आई एकविरा माझ्या सोबतीला होती व तिनेच तुमचे व यतिराजांचे मला दर्शन घडविले.

आता काय निर्णय घ्यायचा हा विचार चालू असताच विश्रांती घेत असलेल्या अतिथीशी विचार विनिमय करण्याचे ठरले. मुनी वामकुक्षी तुन उठले, त्या दाम्पत्याने विचारले, व मुनिवर्य उच्चरिले “संगमावरचे संन्यासी प्रत्यक्ष दत्तात्रय आहेत. तुमचे जन्मोजन्मीचे सुकृत म्हणून तुम्हास त्यांच्या सेवेचा लाभ होणार आहे. मनामध्ये कसलेही भय किंतु न बाळगता आपण तेथे राहावयास जावे. मनोहर पादुकांचे पूजन अर्चन सुरु कारावे. सर्व संकटांचे ते निरसन करतील व आपला योगक्षेम चालवण्यास ते समर्थ आहेत. ते तुमच्यावर प्रसन्न आहेत.” मुनिवर्य इतके सांगून निघून गेले. भैरव भटांनी आपल्या कुटुंबाबरोबर संगमी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ, इष्ट, सगे सोयरे यांनी या दैवी कार्यास अनुकूलता दाखवली!

अश्विन वद्य १० सकाळीच त्या दाम्पत्याने  प्रातः आन्हिक आटोपले वैश्वदेव नैवेद्य झाले. शिधा सामुग्री, भांडी व प्रवरणे घेऊन निघाले ग्रामस्थांनी जड अंतःकरणानी निरोप दिला. यति महाराजांना अर्पण करण्यासाठी फळे घेतली. जाताना सातत्याने शुभ शकुन होत राहिले, शुभ्र गाई पडसना दूध पाजताना दिसल्या, भारद्वाज पक्षाचा मंगल ध्वनी ऐकू आला, मुंगूसाचे युगल दिसले, कलशात पाणी घेऊन जाणाऱ्या सुवासिनी आडव्या आल्या. अमेरेश्वरांचे दाम्पत्याने दर्शन घेतले. श्रीगुरुंचा अनुग्रह झालेला गंगानुज नदीतीरी वाट पाहत होता.

स्वामी महाराज पर्णकुटीत होते. स्वामी महाराजांचे दर्शन होताच त्या दंपत्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. दोघेही श्रीचरणी नतमस्तक झाले. स्वामी महाराजांनी प्रसादश्रीफल त्या द्विजपत्नीचे ओटीत घातले व आशीर्वाद  दिला, “अखंड सौभाग्यवती भव! पुत्रवती भव!” त्या तेजपुंज स्वामींचे दर्शनाने ते दाम्पत्य भारावून गेले होते. तरीही तिने थोड्या धिटाईनेच विचारले, ‘महाराज आता माझी साठी झालेली आहे व यांचेही वय आता ८० आहे. आता पुत्रप्राप्ती कशी व्हावी?’ त्यावर कृपासिंधु स्वामी म्हणाले. आमचा हा आशीर्वाद याच जन्मी फलद्रुप होणार आपणास लवकरच एक पुत्र होईल व त्याला पुढे चार पुत्र होतील. त्या चारीही पुत्रांचे वंश औदुंबरास फळे येतात त्याप्रमाणे बहरतील. एका शिळेवर पादुका प्रकट होतील व त्या पादुकांचे यावतचंद्रादिवाकरो पिढ्यानपिढ्या पूजन करावे.

आता आम्हास गंधर्वनगरी (गाणगापूर) येथे प्रयाण करायचे आहे परंतु  मनोहर पादुकांचे रूपाने अहर्निश माझे वास्तव्य राहील. यास्थानी तुम्हास याची वारंवार प्रचिती येईल. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील’. एवढे बोलून स्वामींनी औदुंबर वृक्षा खालील काळ्या पाषाणावर कमडलूतील कृष्णाजल शिंपडले. त्यावर ओंकाराची आकृती बोटांनी रेखली आणि त्याच अंगुलीने मानवी पावलांच्या मुद्रा रेखाटल्या. त्याचे सभोवती शंख, चक्र, पद्मा, गदा, जंबुफळअशी स्वस्ति चिन्हेही रेखाटली आणि आश्चर्य बघता बघता या शुभ चिन्हांसह मनोहर पडयुगुल या शिळेवर प्रकट झाले. हे पाहून भैरवदाम्पत्य व सोबत असलेले आप्तेष्ट भावविभोर झाले.

नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले आणि उपस्थित वारंवार स्वामीजी आणि मनोहरपादुकांचे दर्शन करते झाले. धन्य ते भाग्यवान जे या प्रसंगाचे प्रत्यक्षदर्शी होते. काही वेळाने स्वामीजी भटजींना म्हणाले आपण आणलेली शिधा सामुग्री पादुकासमोर ठेवा. साक्षात अन्न पूर्णा अवतरणार आहे. तिचे पूजन करा. तुम्हालाच काय पण तूमच्या पुत्र पौत्रादी वंशजांना या क्षेत्री राहणाऱ्या ग्रामस्थांना आणि भक्तजनांना यापुढे येथे अन्न व उदकाची  चिंता राहणार नाही. अन्न पूर्णेची पूजाही पर पडली. सर्वत्र सुगंध दरवळला. भटजींना एक पर्णकुटी बांधून दिली. एकादशी दिवशी ब्राम्ह मुहूर्ती भटजी व स्वामीजी स्नानास गेले. द्विजपत्नी सडा समार्जन करू लागली. त्यावेळी तेथे आणखीन वावर जाणवला तो ६४ योगिनींचा. त्यांनी तिला दर्शन दिले व काशी क्षेत्रींच्या योगिनी श्री सेवे साठी कृष्णेच्या पूर्व तीरी असल्याचे सांगितले.

स्वतः अन्नपूर्णा माता येथे महाराजांना भिक्षा देत असे. येथेच भैरवभताने स्वामींच्या अंगावरून येणाऱ्या जलात स्नान केले व अन्हीकही केले. माध्यान्हीस महापूजा केली. श्री नृसिंह स्वामी येथे वास्तव्यास येणार म्हणून प. प. रामचंद्रयोगी येथे वास्तव्यास येऊन राहिले होते. त्यांनी भैरव भटास त्यांचे भाग्याची सलाहाना केली. व त्यांना श्रीपादश्रीवल्लभ व नृसिह सरस्वती आवतारांची माहिती दिली. भैरवदाम्पत्यास आप्तेष्ट व भक्तवृन्दानी वस्त्र, पात्र, प्रवरणे आणली. फळे दूध साखर आणले. सर्वांनी श्रीगुरु व मनोहर पादुकांना वंदन केले. तेथे महाराजांनी भैरव भटांना पुजाविधांन सांगितले. विधिवत पुण्याह वाचन, नंदीश्राद्ध झाल्यावर विधिवत श्रींचे पादुका पूजनाचा संकल्प सोडला. आवाहन मंत्रानंतर पादुकांवर श्रींच प्रत्यक्ष दिसू लागले व सर्वाना पादुका व श्री यांच्यामधील अभिन्नत्व पटले.

भैरव भटजींनी प्रार्थना केली, “महाराज केवळ आपल्या आशीर्वादाने आणि कृपेमुळे आपल्या या दिव्य पादुकांचे पूजन आमच्याकडून घडले आहे. आपणच दिलेल्या अशीर्वाचनानुसार पुढील वंशजांकडून यावचचंद्रदिवाकरो अशीच पूजा अखंड करून घ्यावी. सर्वाना शुद्ध बुद्धी द्यावी, धन-धान्य, यश, कीर्ती संतति, समृद्धी याचा लाभ व्हावा. मानवी स्वभावानुसार काही अपराध घडलेतर मातृहृदयाने उदार अंतःकरणानी सर्वाना क्षमा करावी व आपले कृपाछत्र अखंड लाभावे. आपल्या मनोहर पादुकांची सेवा करणाऱ्या सर्व भक्तांची मनोरथे पूर्ण करावीत.” हि प्रार्थना ऐकतानाच सर्वांची हृदये हेलावली.

या क्षणी प्रत्येक जण पुनः पुनः श्री महाराजांच्या दिव्य मूर्तीचे व मनोहर पादुकांचे अवलोकन करीत ते रूप अंतःकरणात साठवून ठेवत होते. काही क्षण असेच गेले. महाराजांनी दंड कमंडलू हाती घेतले. भैरव भटजींनी श्रींचे चरणकमल घट्ट धरून ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले मी पादुकारूपाने येथेच राहणार आहे. स्वामी पूर्वाभिमुख झाले, कृष्णा प्रवाहा जवळ आले प्रवाह दुभंगला दुतर्फा फुलांचे पुष्करणी दिसले. त्यावरून पुढे जात महाराज दिसेनासे झाले. यथावकाश भैरव भटना पुत्र प्राप्ती होऊन त्यास विवाहानंतर ४ अपत्ये झाली व आज जे श्रीसेवक पुजाऱ्यांचे कुळाचा विस्तार झाला आहे. त्याचे मागे श्री गुरूंचे कृपाशीर्वादाच आहेत. धन्य ते भैरवभट दाम्पत्य व त्यांची गुरुनिष्ठा !

Leave A Reply

Your email address will not be published.