आता तरी केळीला फळाचा दर्जा मिळेल का?

0

45-46 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाने आख्या मे महिन्यात अंगाची लाही- लाही होत असतानाच जून महिना उजाडताच 2 जून रोजी वादळी वार्‍यासह पावसाने झोडपून काढले . जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील केळीचे फार मोठे नुकसान झाले . एकट्या रावेर तालुक्यात 920 हेक्टरमधील उभी केळी आडवी झाली. चोपडा,यावल ,चाळीसगांव,पाचोरा, तालुक्यालाही वादळी पावसाचा फटका बसला. जिह्यातील अनेक गावात गारपिट झाली. तापमानात घट झाल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकर्‍याच्या पिकांचे तसेच पडझडीमुळे शेतीउपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. एकट्या रावेर तालुक्यात केळीचे किमान 60 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास वादळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हताश झालाय . नेमेची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे पाऊस तर नियमित येतच नाही परंतु नेमेचि येतो अस्मानी संकट हि म्ह्ण मात्र आता अंमलात येऊन रूढ होतेय . अस्मानी संकटाने शेतकरी त्रस्त झाला आहे . त्यातच पाऊस नियमित वेळेवर येत नसल्याने पाऊस केव्हा पडेल या साठी मात्र पेरणीसाठी ढगाकडे पाहत शेतकरी ताटकळत बसलेला असतो. गेल्या दहा वर्षात पाऊस कधीच वेळेवर आला नाही . उशिरा आलेल्या पावसात तो कशीबशी पेरणी आटोपतो . पिकांचा उगवण होऊन त्याची वाढ व्हायला लागते तोच पाऊस दडी मारून बसतो . त्याचाच परिणाम पिकांची वाढ खुंटण्यास होतो . आणि उत्पादन मात्र निम्म्यावर घटते . हा ऊन पावसाचा खेळ शेतकरी अनुभवत असतो . आणि उत्पादन खर्च व उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याने तो कर्जबाजारी होतो . आणि या कर्जाचे ओझे त्याला पेलवत नसल्याने तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो . त्यामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या वाढतच आहे . कृषी प्रधान देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा एक नित्याचा भाग झाला आहे . त्यासाठी शेतकऱयांच्या कर्जमाफी करता आंदोलन करावे लागतात . स्वाभिमानी शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी सरकारकडे याचना करावी लागते हे दुर्दैवी सत्य आहे .
2 जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे केळीउत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे . वादळाने केळीचे नुकसान झाल्यावर आमचे लोकप्रतिनिधी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्यासाठी चढाओढ करत आहेत . बहुतांश शेतकर्‍यांनी केळी पिकाचा विमा काढलेला नाही , कारण केळी पिकासाठी काढावयाच्या विम्याची किचकट पद्धती हि होय . शेती पिकाच्या विम्यातील जाचक अटी दूर केल्या जात नाही तोपर्यन्त शेती पीक विमा सहजपणे अमलात येणार नाही . त्यासाठी आमचा खान्देशातील केळी उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून केळीला फळाचा दर्जा द्यावा हि मागणी करीत आहे . द्राक्षे , मोसंबी,संत्रे ,आंबे याला जसा फळाचा दर्जा दिला गेलाय तसा केळीला फळाचा दर्जा दिला जात नाही . केंद्राकडे हा प्रस्ताव पडून आहे . मध्यन्तरी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्री कृषीमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत बोलके आहे . हिंदू धर्मामध्ये सत्यनारायणाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे . सत्यनारायणाच्या पूजेत केळी ठेवली जाते . म्हणून त्याला फळाचा दर्जा द्यावा अशी मागणी खा.रक्षाताई खडसे यांनी कृषिमंत्री राधामोहन यांच्याकडे केली आहे . त्यामुळे हि मागणी केंद्र शासनाकडे पडून आहे . द्राक्षे , मोसंबी आदी फळांची नुकसान भरपाई शेतकर्‍याला मिळते तशी भरपाई केळीलाही मिळावी या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून केळीला फळाचा दर्जा प्राप्त करून घेतले तर ते लोक प्रतिनिधी खरेखुरेशेतकर्‍यांचे प्रतिनिधी आहेत असा त्याचा अर्थ घेतला जाईल . केवळ नुकसान झालेल्या शेतकर्‍याच्या शेतात जाऊन त्यांचे सांत्वन करणे म्हणजे शेत कर्‍याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार म्हणता येईल .
वादळी पावसात ज्या-ज्या शेतकऱयांचे नुकसान झाले त्यांचे सांत्वन करणे हि बाब तर आवश्यकच आहे ,त्याऐवजी नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधीने हिरहिरीने पुढाकार घेणे गरजेचे आहे . तसेच झालेल्या पंचनाम्यानुसार त्या-त्या शेतकर्‍यांना शासनाकडे प्रस्ताव पाठवून तेवढी नुकसान भरपाई मिळवून द्यावी . एवढे जरी लोकप्रतिनिधींनी केले तरी शेतकरी त्यांनाधन्यवाद देतील . जेव्हा अशा संकटांमुळे ज्या-ज्या शेतकर्‍यांचे नुकसान होते ,त्या शेतकर्‍यांना प्रत्यक्षात झालेली नुकसान भरपाई मिळत नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे . पंचनामे करणारी शासकीय यंत्रणा भ्रष्ट झाली आहे . याचा कटू अनुभव धुळे जिल्ह्यातील विखरण येथील धर्मा पाटील या शेतकर्‍याचे ताजे उदाहरण आहे . योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून धर्मा पाटील या शेतकर्‍याला मंत्रालयात जाऊन आत्महत्या करावी लागली . त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र भ्रष्ट शासकीय यंत्रणेचे कारनामे दिसून आले . मृत्यूनंतर धर्मा पाटलाच्या कुटुंबियांना योग्य मोबदला मिळाला . अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी स्वतः लोकप्रतिनिधीने प्रयत्न करावे एवढी शेतकर्‍याच्यावतीने रास्त अपेक्षा !

Leave A Reply

Your email address will not be published.