अमळनेर खून प्रकरणातील आरोपी राज चव्हाणला वाशिम जिल्ह्यातून अटक

0

अमळनेर- शहरात अनेक घरफोड्या व प्राणघातक हल्ला प्रकरणातील कुख्यात आरोपी राज वसंत चव्हाण याला साथिदार रबिया दुलेखां पटवा हिच्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमळनेर  पोलिसांनी बुधवारी रात्री वाशीम जिल्यातील कारंजा येथून दोघांना ताब्यात अटक केली. प्रा. दीपक पाटील खून प्रकरणी गेल्या अडीच महिन्यापासून दोघे फरार होते.

४ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शहरातील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दीपक देवराम पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्रा. पाटील हे डॉ. हजारे अक्सिडंट हॉस्पिटलच्या बाहेर मृतावस्थेत पडलेले आढळून आले होते. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि पायांवर गंभीर दुखापत झालेली होती.

या प्रकरणी मुख्य आरोपी राज वसंत चव्हाण व त्याची साथीदार राबिया दिलेखा पटवा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. दरम्यान, प्रा. पाटील खून प्रकरणातील चौकशीत दिरंगाई केल्यामुळे अमळनेरचे पोलिस निरिक्षक विकास वाघ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

——-अमळनेरमध्ये राजची टोळी———
अमळनेर शहरात राज चव्हाणने एक टोळी तयार केली आहे. या टोळीच्या माध्यमातून तो शहरात घरफोड्या करत होता. या टोळीने स्वामी विवेकानंद नगरात अरुण पाटील यांच्या घरात घुसून धाडसी चोरी केली होती. राजच्या टोळीने दीड वर्षांपूर्वी हॉटेल रुपालीचे मालक कांतीलाल हेमनदास सैनानी यांच्या डोक्यात कुर्हाडीचा घाव घालून गंभीर जखमी केले होत.

याच हॉटेलवरून राडा करून फिरलेल्या दोघांनी पालिका समोरील पान दुकानदार गणेश पाटील यांना पिस्तुल लाऊन त्याच्या पायावर लोखंडी रॉडने घाव केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून 2080 रुपये रोख रक्कम व समसंग मोबाईल काढून घेतला. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी राजला रंगेहात पकडले होते. परंतु, त्यानंतर जामिनावर सुटलेल्या राज चव्हाण याने पुन्हा अमळनेर शहरात धुमाकूळ घातला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे , चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ पाटील किशोर पाटील, सुनील पाटील, प्रमोद बागडे, व त्यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे. अप्पर पोलिस अधिक्षक बच्छाव यांनी राजला पकडणाऱ्यास १५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.