न्हावी विभागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मुजोरीपणामुळे शेतकरी पशुपालक त्रस्त

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी पशुपालकांचे लंपी आजाराने मयत होत असलेले  पशुधन वाचवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. पण याच प्रयत्नांना खोडा देण्याचे काम तालुका यावल न्हावी विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी करत आहेत. सध्या लंपी या विषाणूजन्य आजाराने मुक्या जनावरांना आणि पशुपालकांना हैराण केले आहे. जिल्ह्यातील अनेक डॉक्टर व तालुक्यातील तालुक्याचे अधिकारी सुद्धा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. पण न्हावी विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मात्र आपल्या तोऱ्यात असल्याचे चित्र शेतकरी पशुपालकांना दिसत आहे.

कृषी व पशुसंवर्धन विभागाने लंपी आजारावर मोफत उपचार करा अशा सूचना दिल्या आहेत. पण न्हावी विभागातील पशुवैद्यकीय डॉक्टर बहाद्दर हे शेतकऱ्यांना सर्रासपणे लुटत असल्याचे प्रकार घडत असल्याचे  विभागातील अनेक पशुपालकांनी सांगितले. तसेच लंपी आजाराचे प्रकरण दडपण्याचे प्रकार सुद्धा पशुपालकांनी सांगितले.

डॉक्टर बहाद्दर अर्वाच्य भाषेत बोलत शेतकऱ्यांची पैसे उकळून फसवणूक करण्याचे काम करत आहेत. पैसे नसतील तर गुरे-ढोरे मरू द्या असे उत्तर हे डॉक्टर देत आहेत. पशुधनाचा पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करून पशुपालकांना पोस्टमार्टमच्या आणखी अधिक खर्चात ढकलण्याचे करत आहेत. पोस्टमार्टमचा रिपोर्ट सुद्धा पशुपालकांना देत नाहीत.

यासंदर्भात तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडेही विभागातील लोक त्यांच्या व्यथा सांगत आहेत. पण हे डॉक्टर बहाद्दर ‘माझे होईल ते करून घ्या’ म्हणत शेतकरी पशुपालकांचे हाल हाल करत आहेत. अशा अहंपणाच्या अविर्भावात आलेल्या डॉक्टर एम. सी. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विभागातील पशुपालक करत आहेत. आणि योग्य सेवा देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी सुद्धा शेतकरी पशुपालकांच्या वतीने केली जात आहे.

गावात अनेक जनावरे लंपी आजाराने दगावले आहे. पण पशुवैदयकीय अधिकारी न्हावी हे हलगर्जीपणा करीत आहेत. यामुळे अनेक जनावरे लंपी आजाराने त्रस्त आहे.

– पोलीस पाटील प्रसन्नकुमार पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.