यावल तालुक्यात ऑनलाईन शिधापत्रिका फक्त नावालाच ?

वैद्यकीय कामासाठी देखील माराव्या लागतात चकरा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल शहर प्रतिनिधी-हर्षल आबेकर

यावल तालुक्यात ऑनलाईन शिधापत्रिका फक्त नावालाच आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावल तहसील कार्यालयात पुरवठा विभागात शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी लाभार्थी पायपीट करताना दिसत आहेत. तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी सदर लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्राकडे ऑनलाइन करून घ्या. असे बोट दाखवून हात झटकताना कर्मचारी दिसत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक असताना, या ठिकाणी शिधापत्रिकेची सर्व कामे सुरळीतपणे सुरू होती. परंतु हे पद रिक्त झाल्यापासून या ठिकाणी सर्व कामांचा बोजवारा उडाला आहे.

एकीकडे जिल्हाधिकारी वैद्यकीय कामासाठी कोणाचेही अडवणुक केली जाणार नाही. असे सांगतात तर दुसरीकडे यावल तहसील विभागातील पुरवठा विभागात लाभार्थ्यांना फिरवले जाते. ज्या लाभार्थ्यांचे नाव अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट आहे. त्यांचेच शिधापत्रिका ऑनलाईन आहेत. परंतु यांचे अन्नसुरक्षा योजनेत नाव समाविष्ट नाही. अशा लाभार्थ्यांचे शिधापत्रिका ऑनलाईन दिसत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना वैद्यकीय कामासाठी शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी तहसीलच्या चकरा माराव्या लागत आहेत. या सर्व गोष्टींकडे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी लक्ष केंद्रीत करून कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातुन होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.