जग ही एक रंगभूमी आहे !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जागतिक रंगभूमी दिन हा दर वर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा केला गेला होता. १९६१ मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची व्यक्ती संदेश देते.

१९६२ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय संदेश देण्याचा मान फ्रान्सच्या जीन काॅक्टो (Jean Cocteau) यांना मिळाला होता. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे.  २०२२ मध्ये ह्या संदेशाचे लेखक अमेरिका चे “पीटर सेलर्स” आहेत

ते ऑपेरा थिएटर आणि फेस्टिव्हल चे डायरेक्टर आहेत.  २००२ मध्ये भारताचे गिरीश कर्नाड यांना ही संधी मिळाली.  हा संदेश ५० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर केले जाते. २७ मार्च १९६२ रोजी जागतिक पातळीवर नाट्य विचारांचा प्रवाह एकत्रितपणे सुरु झाल्याने हा दिवस ” जागतिक रंगभूमी दिन ”  म्हणुन साजरा केला जातो.

” थिएटर ऑफ नेशन ” अर्थात राष्ट्रीय रंगमंच स्थापन करण्यामागील काही महत्त्वाचे मुद्दे या संकल्पनेनुसार जगासमोरील ठेवले गेले.  मानवांचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नाट्यकलेचा नाट्यविष्कार , हे शक्तिशाली माध्यम मानले गेले.  या माध्यमाचा वापर वैदिक काळापासून ते आजच्या प्रस्थापित रंगभूमीपर्यंत जागतिक पातळीवर विविध अंगाने झाला आहे.

नाटक हे माध्यम सर्वव्यापी व्हावे, या उद्देशाने थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेची अंमलबजावणी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या संस्थेने केली. रंगभूमीवरुन जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेने दिला.  आजपर्यंत थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेशी जगातील ९० देश जोडले गेले आहेत. २७ मार्च १९६१ ते २७ मार्च १९६२ या कालावधीत एकूण ८५ देशांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.

या व्यासपीठावरून जगविख्यात नाटककारांनी नाटकाविषयीचे आपले चिंतन मांडले. शेक्सपियरने ” जग ही एक रंगभूमी आहे “असे म्हटलेले आहे. नाटकाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकास नाट्यसृष्टी आतून व बाहेरुन पाहता येते.  त्यामुळे  नाट्यविष्काराचा प्रत्येक क्षण सजीव असतो व नाटक या प्रक्रियेत तो क्षण नव्याने जन्म घेत असतो, असे यावरील अभ्यासकांचे तात्विक चिंतन आहे.

जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे, नाटक, कला या रंगभूमीशी निगडीत गोष्टींना जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून देणे हा आहे. इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात ग्रीक रंगभूमीवर झालेल्या नाटकापासून ते आजपर्यंत जगात नाटक होत आहेत.

म्हणजे जवळपास अडीच हजार वर्षांपेक्षा अधिक काळ  नाटक नावाची गोष्ट आपल्यावर गारूड करत आहे. पूर्वी आजच्या सारखे रंगमंच नव्हते, तेव्हा एका मैदानात रंगमंच उभारले जात असे.  पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली.  विष्णुदास भावे यांच्या ” सीता स्वयंवर ” या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली.

५ नोव्हेंबर १८४३ मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या  संवाद, संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. म्हणुन ५ नोव्हेंबर हा दिवस ” मराठी रंगभूमी दिन ” म्हणुन साजरा करतात. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळण घेतली. त्यातील एक महत्त्वपूर्ण वळण म्हणजे संगीत नाटक ही मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता.

असे मानले जाते की  पहिले नाटक एथेंस मध्ये एक्रोप्लिस मध्ये असलेले  थिएटर ऑफ डायोनीसस मध्ये आयोजन केले गेले होते. त्याच्यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीस मध्ये खुप प्रचलित झाले.  आज विकसित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्कृष्ट चित्रपट, बोलपट तयार केले जातात.  पण आजही रंगभूमी ही आपले अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकवून आहे.  यामधून कित्येक उत्कृष्ट कलाकार आपल्याला पाहायला मिळतात.  ही सारी रंगभूमीचीच देण आहे.

 

– शब्दांकन ː पूजा सोनावणे

 

Leave A Reply

Your email address will not be published.