जागतिक रेडिओ दिन ! जाणून घ्या रेडिओचा रंजक प्रवास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रेडिओ… एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग होता. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता. परंतु टेलिव्हिजन आणि मोबाईलचा शोध लागल्यानंतर रेडिओचा वापर कमी झाला. मात्र, अजूनही रेडिओचे महत्त्व अबाधित आहे. कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून आजही रेडिओकडे पाहिले जाते. खेडेपाडे तसेच तळागाळापर्यंत रेडिओने आपले अधिराज्य गाजवले आहे. आजपर्यंत माहितीची देवाणघेवाण आणि जगभरातील लोकांना शिक्षित करण्यासाठी रेडिओने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक रेडिओ दिन (World Radio Day) म्हणून साजरा केला जातो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला (All India Radio) ‘आकाशवाणी’(Aakashwani) हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली रेडिओ क्लब इथे झाली.1936 साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले.

ऑल इंडिया रेडिओ हे जगातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क आहे. आकाशवाणीच्या अनेक भाषांमध्ये अनेक सेवा आहेत. प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, लखनौ आणि तिरूचिरापल्ली या ठिकाणी आकाशवाणीची प्रमुख केंद्र आहेत.

अशी झाली ‘जागतिक रेडिओ दिवसा’ची सुरुवात

19व्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन शोधक आणि विद्युत अभियंता गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला. प्रसारकांमध्ये रेडिओचे जाळे मजबूत करण्यासाठी तसेच रेडिओविषयी विविध माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज रेडिओ हे सर्वात जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. 1945 मध्ये आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिले प्रसारण झाले होते. त्यामुळे हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. स्पेन रेडिओ अकादमी’ने 2010 मध्ये ‘जागतिक रेडिओ दिवस’ साजरा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर युनेस्कोच्या 67 व्या सत्रात 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयाला संयुक्त राष्ट्रसंघाने 14 जानेवारी 2013 रोजी मान्यता दिली. दरवर्षी युनेस्कोद्वारे जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांनाच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

 

‘बिनाका गीतमाला’ ते ‘मन की बात’
सत्तरच्या दशकातील एक गोष्ट जिने आजच्या दशकालाही क्रेझ लावली आहे ती म्हणजे ‘बिनाका गीतमाला’. १९५२ सालापासून रेडिओ सिलोनवर ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम सुरू झाला. ‘बहनों और भाईयों ’ हा आवाज रेडिओमधून आला की दर बुधवारी लोक सरसावून बसायचे. कारण बिनाका गीतमाला सुरु व्हायची. प्रत्येक बुधवारी रात्री ८ वाजता रस्ते निर्मनुष्य असायचे. सारा देश त्यावेळी फक्त आणि फक्त बिनाका ऐकत असायचा. अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय झाला.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात. जनतेशी जुळणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश..

रेडिओमध्ये झालेले अनेक बदल

इतक्या वर्षांत माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरे आली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. मात्र काळानुसार त्यात बदल झाले.

निवेदक नव्हे आरजे

रेडिओची भाषा बदलली. निवेदकांची जागा ‘आरजे’ने घेतली. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते.

ट्रॅफिक आणि रेडिओ

महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. पण प्रवासाचा वेळ जेवढा वाढत आहे, तेवढं रेडिओ ऐकण्याचं प्रमाणही वाढत आहे. म्हणूनच नवनवे रेडिओ चॅनेल्स येतच आहेत.

कम्युनिटी रेडिओ

मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारने कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरू केली आहे. काही विद्यापीठांचेदेखील स्वत:चे कम्युनिटी रेडिओ आहेत. सध्यस्थितीत भारतात सुमारे २५१ कम्युनिटी रेडिओ आहेत. त्यापैकी भारतात २२ आहेत. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनने आपले जाळे विस्तारण्यापूर्वी रेडिओ हेच सर्वसामान्य लोकांचे ज्ञान, मनोरंजन व ताज्या बातम्या मिळविण्याचे साधन होते.

माहिती, ज्ञान, प्रबोधन व मनोरंजनाचे केवळ रेडिओ हेच साधन असलेल्या पिढीला ‘रेडिओ जनरेशन’ अशी संज्ञा आहे. या पिढीचा मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास अधिक संतुलित आणि अर्थपूर्ण झाल्याचा अनेक संशोधकांचा निष्कर्ष आहे. खासकरून एकाग्रता, मनोनिग्रह, संयम, चिकाटी इत्यादी आंतरिक गुणवैभवात रेडिओने अधिक भर घातली आहे.

शब्दांकन- कविता ठाकरे

 

Leave A Reply

Your email address will not be published.