महिलांना आजही मिळतोय का हवा तेवढा सन्मान?

0

लोकशाही विशेष लेख

विज्ञानाच्या या जगात वावरत असताना हे तर कळतंय, की जग आज आकाशाला भिडतय पण, का आजही स्त्री मागेच राहिली आहे? आजही का तिला समाजात, या जगात दुय्यम स्थान मिळतंय? आजही का तिला सांगितले जाते की तुझे स्थान हे दुय्यमच आहे? एकीकडे शासनाकडून महिलांसाठी अनेक अशा योजना राबवल्यात जात आहेत, महिलांना 50% टक्के आरक्षण दिलं जातंय.. तरी देखील आजही खेड्यापाड्यात पुरुष प्रधान संस्कृती कायम राहिली आहे. खेड्यापाड्यातील महिला आज देखील पुरुषांवर का अवलंबून आहेत? का त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येत नाही? का त्या स्वतः स्वतःच्या आयुष्य हवं तसं जगत नाहीयेत?

आजही त्या फक्त चुल आणि मुल यांवरच राहिल्या आहेत. खरंच जर महिलांना या समाजात सन्मान मिळवायचा असेल, स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल तर, त्यांनी स्वतः स्वतःसाठी काम केलं पाहिजे.. स्वतः स्वतःच्या अस्तित्वासाठी लढल्या पाहिजेत.. शासनाने लाखो जरी नवीन योजना अस्तित्वात आणल्या, तरी देखील महिलांना सन्मान मिळणार नाही. जरी त्यांना समाजात सांगितलं जात असेल किंवा तिच्यावर लादून दिलं जात असेल की, हा समाज फक्त पुरुषप्रधान समाज आहे. तर तिने देखील या समाजाला दाखवून दिलं पाहिजे की, एक स्त्री पुरुषापेक्षा कमी नाही. ती देखील आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकते. महिलांने पुढे येऊन स्वतःसाठी लढले पाहिजे. तिने या समाजाला दाखवून दिलं पाहिजे की, ती फक्त चूल आणि मुल यासाठीच जन्मलेली नाही. तिचं देखील एक अस्तित्व आहे..

शासनाच्या प्रत्येक योजनांचा आढावा घेऊन स्वतःसाठी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिने स्वतः लढले पाहिजे. जेव्हा एक स्त्री शिकत असते तेव्हा ती स्वतःलाच नव्हे तर पूर्ण कुटुंब कुटुंबाला शिक्षित करत असते, आणि एक स्त्री ही एका कुटुंबाचा उद्धार करणारी नसते तर दोन कुटुंबाचा उद्धार करणारी असते. म्हणजे स्त्री शिकली तर ती दोन कुटुंबांना शिक्षित करते त्या परिवारांचा उद्धार करत असते. हे प्रत्येक महिलेने हे स्वतः समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत ती स्वतःसाठी लढत नाही, जोपर्यंत पारतंत्र्यातून निघत नाही तोपर्यंत तिचे स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही.. तोपर्यंत तिला या समाजात सन्मानही मिळत नाही.

जेव्हा सगळे दिवस सारखे वाटतात तेव्हा सूर्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवशी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सुंदर गोष्टी माणसांना जाणवत नाहीत. तसेच हे एका स्त्री बद्दल घडतंय.. जे आधीपासून चालत आलंय तेच पुढे चालत राहणार आणि आपलं आयुष्य आपल्याला असंच जगावं लागणार असं तिला वाटतंय.. सर्वे दिवस ती सारखे जगत असल्यामुळे तिला या गोष्टींची जाणीवही नाही, की हे जग आता आकाशाला देखील पोहोचल आहे. उगवणाऱ्या नवीन सूर्यादया सोबत आपण देखील नवीन काही शिकून आपण देखील सूर्यासारखं उगवलं पाहिजे..

येणाऱ्या प्रत्येक दिवसात आपण देखील आकाशाला पोहोचले पाहिजे. प्रत्येक महिलेच्या मनात हाच विचार येत असेल की, ‘मी जर घराबाहेर निघाली, नवीन काही शिकण्याचा प्रयत्न केला तर, लोक काय म्हणतील? लोकांच्या मनात काय विचार येईल?’ याच विचारांमुळे त्या स्वतःच्या सुंदर घडणाऱ्या आयुष्याला इथेच ब्रेक लावून जसं चाललंय तसं चालू देतात. मग त्या कारणांमुळे किंवा तिच्या अशिक्षितपणामुळे म्हटलं तरी तिचा घरात छळ होतो, तिला शिव्या, मार खावा लागतो.. असे अनेक प्रकारचे त्रास तिला भोगावे लागतात.

पण हे कोणामुळे? हे फक्त स्वतः मुळे.. किंवा लोक काय म्हणतील याचं कारणांमुळे.. लोकांचा विचार करून स्वतःच्या आयुष्याची कशाला राख रांगोळी करावी, हा विचार मात्र तिच्या मनात अजिबातही डोकावत नाही. का तिला कळत नाही की, लोकांना नव्हे तर तो त्रास तिला सहन करावा लागणार आहे.
म्हणून म्हणते स्त्री लढली पाहिजे ,स्त्री जगली पाहिजे, स्त्री शिकली पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःला या समाजात सन्मान मिळवण्यासाठी . स्त्रीने देखील या नव्या जगासोबत‌ स्वतःला अपडेट केलं पाहिजे. या नव्या जगासोबत तिचे देखील नवं अस्तित्व निर्माण केले पाहिजे. या समाजात तिला देखील एक मानाचा सन्मान मिळाला पाहिजे..

यासाठीच तिने लढले पाहिजे…

गायत्री पाटील
मांजरे जि. नंदुरबार

Leave A Reply

Your email address will not be published.