आला हिवाळा त्वचा सांभाळा !

0

लोकारोग्य विशेष लेख 

दिवाळीनंतर हळूहळू थंडी वाढू लागते. हेमंत ऋतूमध्ये छान गुलाबी थंडी असते तर शिशिर ऋतूमध्ये कडाक्याच्यी थंडी असते. संक्रांतीपर्यंत आपण ही थंडी अनुभवत असतो. या संपूर्ण काळात वातावरण रूक्ष असते कारण थंड कोरडे वारे वाहू लागतात त्यामुळे त्वचा कोरडी खूप रुक्ष होते, त्वचा काळवंडलेली दिसते, चेहऱ्याची त्वचाही निस्तेज होते, काळपट दिसते, तळहात तळपायाला भेगा पडतात, हातापायाच्या त्वचेवर पांढरट ओरखडे उठतात आणि खूप जास्त कोरडी त्वचा दिसते, केसही वृक्ष होतात, केसात कोंडा जास्त होतो, केस दुभंगतात तुटतात या सगळ्या लक्षणांमुळे हिवाळ्यात त्वचेची व केसांची जास्त काळजी घ्यावी लागते यासाठी आयुर्वेदात खूप छान उपाय सांगितले आहेत.

हिवाळ्यामध्ये वातदोष वाढलेला असतो त्यामुळे वातदोषाला संतुलित करण्यासाठी जे उपाय सांगितले आहेत ते करावे. त्यात सगळ्यात पहिला उपाय आहे ते म्हणजे स्नेहन अर्थातच अंगाला तेल लावून मसाज करणे. दिवाळी सणांमध्ये अभ्यंग म्हणूनच सांगितले आहे .दिवाळीपासून रोज अभ्यंगाला सुरुवात करावी अंगाला तेल लावून हलकी मालिश करावी व नंतर गरम पाण्याने उठणे लावून अंघोळ करावी मसाजसाठी तीळ तेल, खोबऱ्याचे तेल, आयुर्वेदिक सिद्धतेल जसे शतावरी तेल, चंदनबलालाक्षादी तेल इत्यादी वापरू शकता.

 

रात्री झोपताना चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी 

रोज रात्री झोपताना नाही तीन-चार थेंब घालून झोपावे यालाच नाभीपुरण असेही म्हणतात. १याशिवाय कर्णपुरण, नस्य, पादाभ्यंग, शिरो अभ्यंग हे उपायही करावे. चेहऱ्याच्या त्वचेची तर विशेष काळजी घ्यावी लागते. चेहऱ्याला लावण्यासाठी बदामाचे तेल, खोबरेल तेल, गाईचं तूप, शतधौत घृत यांचा वापर करावा विशेषतः रात्री झोपताना चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा व वरीलपैकी कोणतेही एक तेल किंवा तूप घेऊन चेहऱ्याला पाच ते सात मिनिटे मसाज करावा हा मसाज करताना तो अपवर डिरेक्शनमध्ये असावा. डोळ्याखालीही हलक्या हाताने हळुवार मसाज करावा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे व सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.  आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा चेहऱ्याला वाफ घ्यावी त्यामुळे चेहरा स्वच्छ होऊन तेल हात पर्यंत मोडते. रोज वाफ घेऊ नये त्यामुळे चेहरा काळपट होऊ शकतो चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काही डाग वांग किंवा पिगमेंटेशन झाले असेल तर तिथे आवर्जून मसाज करावा. त्यामुळे तिथे रक्ताभिसरण सुधारते व डाग कमी होण्यास मदत होते.  ही झाली रात्री झोपताना घेण्याची काळजी.

 

सकाळी उठल्यावर चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी 

सकाळी उठल्यावर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहरा धुताना गरम पाणी वापरू नये. साध्या किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवावा. गरम पाण्यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक स्निग्धता कमी होते. त्यानंतर दुधावरची साय तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळायला व चेहरा स्वच्छ व्हायला मदत होते.  आंघोळीसाठीही थोडे दूध व साय वापरले तर त्वचा खूप सुंदर होते.  पूर्वीचे लोकं ताज्या दुधाने अंघोळ करायच्या त्यामुळे त्यांची त्वचा अतिशय तजेलदार व सुंदर आणि सॉफ्ट असायची. दुधात थोडी हळद व लिंबू रस घातला तर उत्तम क्लिनझर होते. चंदन, नागरमोथा, त्रिफळा,  संत्रसाल, आंबेहळद इत्यादी हर्ब्सपासून बनवलेले असेल ते वापरावे किंवा तुम्ही घरगुती उठणेही वापरू शकता.  त्यासाठी मसूर डाळीचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, हिरव्या मुगाचे पीठ, इत्यादीचा वापर करता येतो.  वरीलपैकी कोणतेही एक पीठ घेऊन त्यात थोडेसे दूध, हळद, मध घालून घरगुती स्क्रब तयार करता येतो त्यामुळे त्वचा रुक्ष होत नाही डेड स्किन निघून जाते आणि खूप छान ग्लो येतो त्वचा तजेलदार होते.

 

चेहऱ्यासाठी  महत्वाचे 

1. पिंपल्स घालवण्यासाठी – चंदन, मुलतानी माती, संत्रा साल, आंबेहळद, तुळस पत्र एकत्र करून गुलाबजलात मिक्स करून लावणे यामुळे पिंपल्स कमी व्हायला मदत होते.

2. डाग वांग घालवण्यासाठी – मंजिष्ठा, तुळस पत्र, अनंतमूळ,  हळद, रक्तचंदन एकत्र करून दूध किंवा गुलाबजलात मिक्स करून लावणे.

3. त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी- ग्लिसरीन, एलोवेरा जेल, विटामिन ई कैप्सूल, बदाम तेल एकत्र करून रात्री झोपताना लावणे यामुळे त्वचा छान स्निग्ध होते.

हे सगळे घरगुती उपाय तुम्ही नक्की करा. केमिकलयुक्त साबण, क्रीम, फेसवॉश, शाम्पू, बॉडी लोशन इत्यादी गोष्टी टाळा.  कारण या सगळ्यामुळे आपल्या त्वचेला पोषण मिळत नाही ते फक्त बरोबर करणारे उपाय आहेत.  पण आतून जर तुमची त्वचा तुम्हाला छान करायची असेल तर हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला नक्की फायद्याचे ठरतील.

 

डॉ. लीना बोरुडे 

आयुर्वेदाचार्य 

पुणे

फोन. 9511805298

 

Leave A Reply

Your email address will not be published.