ओसाड खडकावर फुलवली खरबुज आणि टरबुजाची शेती

0

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील श्रीक्षेत्र चौंडेश्वर शिवारातील ओसाड, खडकाळ व मुरमाड असलेल्या शेतात खरबुज, टरबुज यांची शेती एका शेतकऱ्यांने फुलवली असून जवळपास दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

वाकोद येथील भगवान राऊत यांची श्रीक्षेत्र चौंडेश्वर शिवारात शेती आहे. ही शेती खडकाळ, मुरमाड व ओसाड होती. राऊत हे गेल्या ३० वर्षापासून शेती करत आहेत. सुनिल राऊत, विनोद राऊत, भगवान राऊत हे तिघे भाऊंचे एकत्रित कुटुंब असल्यामुळे लाखाचे उत्पन्न घेत प्रयोग यशस्वी करून दाखवला.
कोरोनाकाळात दोन ते पाच रुपये किलोने विक्री करण्यात आलेल्या फळांना यंदा दहा ते बारा रुपये किलोचा भाव बाजारात मिळत आहे. त्यामुळे हंगामी फळांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारात टरबूज, खरबूज मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील टरबूज, खरबूज उत्पादकांना कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधांचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र आता सर्व निर्बंध हटवण्यात आले असून, सर्व बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे टरबुजाची मागणी वाढली असून भावही चांगला मिळत आहे.

मी २ एकरात टरबुज, खरबुजाचे आतापर्यंत २० टन उत्पादन घेऊन दोन लाख रूपये आले आहे. टरबुजांचा दर्जा चांगला असल्याने बाजारात मागणी वाढली आहे. लागवडीसाठी ३५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. यानंतर अजून १० ते १५ टन उत्पादन होईल अशी माहिती शेतकरी भगवान राऊत यांनी दिली.
स्थानिक बाजारपेठेबरोबरच जिल्ह्याबाहेरील मलकापुर, कोल्हापूर फळांची मागणी येत असल्याने भावात तेजी आली आहे.

सध्या फळांना १० ते १५ रुपये किलो असा भाव आहे. त्यामुळे केवळ ७० दिवसांत येणाऱ्या या फळपिकाने शेतकऱ्यांना मालामाल केले आहे. यंदा टरबुजाच्या एकरी उत्पादनात मोठी घट झाल्याने या वाढीमुळे काही मोजकेच शेतकरी नुकसान भरून काढू शकले आहेत. व्यापारी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतातून फळे खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात आणण्यासाठीचा वाहतूक खर्चही कमी झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.