१६ जून रोजी राजभवनात शेठ वालचंद हिराचंद यांच्या सुवर्णमहोत्सवी व्याख्यानाचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये गुंफले जात आहे. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक, भारताच्या उद्योग जगतातील महनीय व्यक्तिमत्व `शेठ वालचंद हिराचंद`  यांच्या स्मरणार्थ दरवर्षी व्याख्यान संपन्न होते. या वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी स्मृति व्याख्यानचा `आत्मनिर्भर भारत` असा विषय आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य या दिमाखदार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. राज्यपाल रमेश बैस आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा या वेळी संपन्न होणार आहे. त्यासह मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र चेंबरच्या वतीने नाशिक येथे ६ ते ९ ऑक्टोबर, २०२३ रोजी होत असलेल्या `मायटेक्स एक्स्पो` या औद्योगिक प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते होईल.

महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, सेवा, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरच्या विविध विकासपूरक उपक्रमांचे सादरीकरण व आत्मनिर्भर भारत संकल्पनेत ‘मेक इन महाराष्ट्र’ ला चालना देण्याच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होईल, असा विश्वास ललित गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.