वरखेडी, भोकरी येथे स्वस्त धान्य दुकान चालकांकडून कार्ड धारकांची फसवणूक

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील वरखेडी व भोकरी येथे स्वस्त धान्य दुकान चालकांकडून लाभार्थी कार्डधारकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने या दुकान चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी व येथील दुकान चालकांचा परवाना रद्द करण्यात यावा असे निवेदन ८ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी, वरखेडी – पिंपळगाव गट अध्यक्ष चिराग शाह, वरखेडी शाखा अध्यक्ष चंदन गोसावी, तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश पवार, सुनिल दांडगे हे उपस्थित होते.

मौजे वरखेडी व भोकरी या गावांमधील स्वस्त धान्य दुकानात भोंगळ कारभार सुरू असून गोरगरिबांना महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रति व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देत असून मौजे वरखेडी व भोकरी या गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानदार हे ग्राहकांची लूटमार करत असून, ज्या लाभार्थी कार्डधारकांना ३५ किलो धान्य मिळते त्या कार्डधारकांना २५ किलो धान्य देण्यात येते व ज्या कार्डधारकांना २५ किलो धान्य मिळते. त्यांना १५ ते २० किलो धान्य वाटप करत असून लूटमार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

भोखरी गावातील स्वस्त धान्य दुकानावर साधे स्वस्त धान्य दुकानाचे नाव फलक नाही. यासंदर्भात वारंवार तोंडी तक्रारी करून देखील ही कोणी कानावर घेत नाही. सदर दुकानदार हे अरेरावेची भाषा करत असून तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या असं म्हणत ग्राहकांना तिथून हाकलून लावतात अशा प्रकारे वरखेडी व भोकरी येथील काही ग्राहकांनी वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी तक्रार दिलेली आहे. या करिता वरखेडी व भोकरी गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे तात्काळ स्वस्त धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात यावा. आणि सदर दुकानदारास परवाना देण्यात आल्यापासून आज रोजी पर्यंत ग्राहकांची केलेली फसवणूक व लुटमार याची सखोल चौकशी करून कायदेशीर गुन्हा नोंद करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. या करिता वंचित बहुजन आघाडी तर्फे तक्रार निवेदन देण्यात येत आहे. असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलनाचा पावित्रा करण्यात येईल. या घटनेस प्रशासन जबाबदार राहिल अशा आषयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.