‘वंचित’चा महाविकास आघाडीला फायदाच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई – शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे महाविकास आघाडीला राजकीय फायदाच होऊ शकतो. कारण गेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना वंचितच्या मतविभाजनाचा फटका बसला होता. अर्थात, जागावाटप हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा असेल.

महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी सामील झाल्यास आघाडीला बळच मिळू शकेल. काँग्रेस व राष्ट्रवादीला शिवसेना-वंचित आघाडी कितपत मान्य होईल यावर सारे अवलंबून असेल. ठाकरे व आंबेडकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी शरद पवार यांनी आमच्याबरोबर यावे, असे आवाहन केले. आंबेडकर यांच्या या विधानाला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्षेप आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा जन्म झाला. असे असताना प्रकाश आंबेडकर यांनी पवारांना आमच्याबरोबर यावे, असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी नापसंती व्यक्त केली. ‘मी या भानगडीत पडत नाही’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीबाबत रविवारी व्यक्त केली होती.

प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करावी म्हणून काँग्रेसने अनेकदा प्रयत्न केले होते. अकोला लोकसभा मतदारसंघात आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. आंबेडकर यांना यूपीए मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले होते. यामुळे आंबेडकर यांच्या सहभागाला काँग्रेसचा आक्षेप असण्याची शक्यता नाही. प्रकाश आंबेडकर हे नेहमीच शरद पवार यांच्यावर टीका करीत आल्याने राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते यावर सारे अवलंबून असेल.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना-वंचितच्या युतीचा महाविकास आघाडीवर परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. कारण महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता कमीच आहे. मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचे काँग्रेसने आधीच निश्चित केले आहे. काँग्रेस स्वतंत्रपणे लढणे हे शिवसेनेला फायदेशीर ठरू शकेल. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र राहिल्यास महाविकास आघाडीत जागावाटपाचा मुद्दा येऊ शकतो. कारण प्रकाश आंबेडकर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर दावा करू शकतात.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात स्वत: प्रकाश आंबेडकर हेच रिंगणात होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सात ते आठ उमेदवारांना वंचितच्या मतविभाजनाचा फटका बसला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.