मुंबई – विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचं बोलले जाते.
मात्र या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी विधानभवनात येऊ नये अशी प्रथा आहे. सत्ताधारी मंत्री आमदारांमध्ये हमरीतुमरी होणे धक्कादायक आहे. वरिष्ठांनी लहानांना कसं वागवायचे हे योग्य नाही. संस्कृती धुळीस मिळवली आहे. महेंद्र थोरवे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. विधानसभेत असं होऊ नये असं प्रामाणिक मत आहे. विधानसभेचे नावलौकीक कायम राहू द्या असं राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तर महाराष्ट्रात भाजपानं जे राजकारण उभं केले, त्यात सभागृहालाच आखाडा केलेला दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांवर लॉबीत भिडले गेलेत. हे खोक्याचे प्रकरण आहे. हा प्रकार लाजिरवाणा आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.