आरोग्यदायी वड (भाग एक)

0

लोकशाही विशेष लेख

हा भारतीय वृक्ष सर्व देशभर गावागावातून आढळतो. सामान्यतः गावाच्या मध्यभागी वडाचे खूप मोठे झाड, त्याच्या तळाला ओटा/ पार बांधलेला, समोर खेळायला मोकळी जागा, डावीकडे मोठे मंदिर, उजवीकडे विशाल तळे, पारावर ग्रामस्थांची सभा, तंटे-बखेडे दूर करण्याचे त्यांचे काम, हे दृश्य हजारो खेड्यांतून आजही दिसते. वटपौर्णिमेला (ज्येष्ठ शु. १५) तर या झाडाची पूजा सर्व स्त्रिया करतात, कारण या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमधर्माकडून मिळवले, त्या दिवसाची स्मृती.
पिंपळाप्रमाणे वडाचे झाडही शेकडो वर्षे जगते. खरे म्हणजे मोठ्या फांद्यांवरून जमिनीकडे येणाऱ्या पारंब्या जमिनीत रुजतात व झाडाला आधार देतात. त्यामुळे काही कारणाने मूळ झाड नष्ट झाले तरी पारंब्यांच्या अस्तित्वामुळे ते झाड अमर होते. असा एक महावृक्ष कोलकत्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पहायला मिळतो. त्याच्या पारंब्या काही हजार आहेत. त्यांचा परिसर छायेखाली लाख लोक बसू शकतील. एवढा मोठा आहे.
वडाची पाने जाड, वरून गुळगुळीत व खालून लवयुक्त असतात. फुले एकलिंगी असतात. परागावहन कीटकांमुळे होते. फळे लाल, सुमारे १ सें.मी. व्यासाची फेब्रुवारी-मार्च व ऑगस्ट-सप्टेंबर या काळात मिळतात ते पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. त्यांच्या विष्ठेतून बिया पसरतात व त्यातून नवीन झाडे उगवतात.

गुणधर्म –

१) तुरट रस २) शीत वीर्य ३) कफदोषनाशक ४)जंतुनाशक ५) पित्तदोषनाशक ६) त्वचेचा वर्ण उजळतो ७) रक्तस्तंभक ८) जिवाणुनाशक व ९) बुरशीनाशक.
उपयुक्त भाग –

१) खोडाची आंतरसाल, २) कोवळ्या पारंब्या, ३) त्यांची कोवळी पाने व अंकुर, ४) फळे आणि ५) चीक (Latex)

वडामधील घटक

कीटोन्स, फ्लेवोनॉइडस्, स्टीरॉल्स, रिगलिक अॅसिड, फायटोस्टेरोलिन इ. सोळा प्रकारची नैसर्गिक रसायने वडामध्ये सापडली आहेत.

वापरण्याची रीत-

१) आंतरसालीचा काढा, २) वाळलेल्या पानांची पूड, ३) पारंब्यांच्या टोकाचे अंकुर, ४) त्यांच्या टोकांना रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून पितात. ५) फळे वाटून पेस्ट करतात. ६) पाने गरम करून बाहेरून बांधतात व ७) चीक बाहेरून लावतात.

आरोग्यासाठी वडाचे फायदे

१) आरोग्य संरक्षक व अँटिऑक्सिडंट- वडाचे खोड व पाने यात अनेक अँटिऑक्सिडंट किंवा आरोग्यरक्षक नैसर्गिक रसायने असतात. त्यामुळे सर्दी, पडसे, फ्लू इ. अनेक रोगांना अटकाव होतो. वाळलेल्या पानांची पूड पाण्यात टाकून ते पाणी उकळवावे व नंतर गाळावे आणि प्यावे. किंवा वडाची आंत्रसाल पाण्यात १० मि. उकळून तो काढा गाळून प्यावे.

२) ओकारी – अन्य उपायांनी आटोक्यात न येणारी हट्टी ओकारी असते. त्यावेळी वडाच्या पारंब्यांची टोके चावून खातीव. याने ओकारी येणे थांबते.

३) केसांचे विकार -बाजारात बरीच वाटिकातेले मिळतात. त्यात वडाचे तेल हे मुख्य असते. वडाच्या पारब्यांच्या टोकाचा रस काढून तो तिळाच्या तेलात टाकतात, मिसळतात व त्याला मंदाग्नीवर उकळतात. पाणी उडून गेल्यावर थंड होऊ देतात. नंतर ते गाळले की हे तेल तयार होते. त्यातील शीत गुणधर्म केसांच्या गळण्यावर उत्तम उपाय आहे. या तेलामुळे मेंदूलाही शांतपणा (Soothening) येतो. केसांची लांबीही चांगली वाढते. ४) कोलेस्टेरॉल – वडाची आंतरसाल (२” लांब ह्र १” रुंद) एक कप पाण्यात टाकून १० मिनिटे उकळल्यास सर्व अर्क पाण्यात उतरतो. हा काढा रोज दोन वेळा प्यायल्यास वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.

५) चामखीळ – वडाचे पान खुडताना जो पांढरा चीक बाहेर येतो तो चामखिळीवर लावावा व वाळू द्यावा. हा चीक लावण्याचा उपाय रोज एकदा याप्रमाणे काही दिवस रोज करावा लागतो.

६) जखमा – वडाच्या रसाचे गुणधर्म तुरट रस, जंतुनाशक, बुरशीनाशक,” जिवाणूनाशक असे असल्यामुळे, जखमा प्रभावीपणे भरून काढल्या जातात. वेदना थांबतात. बाह्योपचार म्हणून वडाची पाने वाटून वा गरम करून जखमेवर लावतात. त्यामुळे पू होत नाही व अगोदर पू झालेला असल्यास तो बाहेर यायला मदत होते. रक्ताची गुठळी करण्याचा गुण असल्याने, रक्तपित्ताने दूषित झालेल्या त्वचेवरील जखमा बऱ्या होतात. जुन्या व्रणावर साल ठेवून बांधावी किंवा वर क्र. ४ मध्ये दिल्याप्रमाणे आंतरसालीचा काढा करून रोज दोन वेळा प्यायल्यास जाठरव्रण / अल्सर या जखमा भरून येतात.

७) जुलाब / अतिसार व आव- सामान्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीला, ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्यांना कोंब यायला सुरुवात होते. पुढील काळात हे कोंब मोठे होतात. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते. त्यामुळे जुलाबाचा त्रास सुरू होतो. यासाठी – १) पारंब्यांच्या टोकांना येणारे हे कोंब नुसते खावेत. किंवा २) हे कोंब रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत व सकाळी गाळून ते पाणी प्यायला द्यावे. आतील द्रव्यांचा अर्क त्या पाण्यात उतरतो. त्याचा फायदा जुलाब थांबण्यात होतो. किंवा ३) हे कोंब थोडासा गूळ व कोथिंबीरीसह वाटून गोळ्या कराव्यात व दर तासाने एकेक गोळी खायला द्यावी. यानेही जुलाब थांबतात. याचा उपयोग आवेसाठीही होतो. (क्रमशः)

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.