मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईतून पराग अग्रवाल यांचं शिक्षण झाले आहे.
जॅक डोर्सी राजीनामा देताना म्हणाले की, कंपनीत सह-संस्थापक ते सीइओ त्यानंतर अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष त्यानंतर अंतरिम-सीईओ ते पुन्हा सीईओ असा 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, आता मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. माझ्यानंतर पराग अग्रवाल कंपनीचा नवा सीईओ असेल.’
https://twitter.com/paraga/status/1465349749607854083?s=20
पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहात होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत, अशी माहिती डॉर्सी यांनी दिलीये.
पराग अग्रवाल यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीही केली आहे.
पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्विटरमध्ये एन्ट्री घेतली. तेव्हापासून ते फक्त ट्विटरमध्येच काम करत आहेत. 2017 मध्ये त्यांना कंपनीचे सीटीओ बनवण्यात आले होते. ते इंजीनियर एक्सपर्टीज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि अॅड नेटवर्कमध्ये तज्ञ मानले जातात. या दोन्ही गोष्टी कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रिपोर्ट अनुसार डॉर्सी यांनी त्यांचं काम खूप आवडतं. इतक्या मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी त्यांच्यातील हे गुण फायद्याचे ठरले आहेत. जेव्हा ते कंपनीत रुजू झाले तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या 1000 पेक्षाही कमी होती. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्येही काम केले आहे.
पराग अग्रवाल हे ट्विटरच्या Bluesky चे नेतृत्व करत होते, ज्याचे उद्दिष्ट सोशल मीडियासाठी खुले आणि विकेंद्रित (Open and Decentralised Standard) मानक तयार करणे होते. CTO या नात्याने, पराग यांच्यावर ट्विटरच्या तंत्रज्ञान रणनीती आणि ग्राहक महसूल आणि विज्ञान संघांमध्ये मशीन लर्निंग आणि AI ची देखरेख या जबाबदाऱ्या होत्या. हिंदुस्तान टाईम्सने PeopleAI चा हवाला देत सांगितलं आहे की, पराग अग्रवाल यांची अंदाजे एकूण संपत्ती 1.52 मिलिअन डॉलर म्हणजेच 11 कोटी 41 लाख 91 हजार 596 रुपये असल्याचे सांगितले आहे.
ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत. जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरच जॅक यांचे आभार मानतो असे पराग यांनी म्हटले आहे.