श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग- ८

प्रेम चालिला प्रवाहो नाम घोष लवलाही

आनंदाच्या कोटी I
सांटवल्या आम्हा पोटी IIधृ II
प्रेम चालिला प्रवाहो I
नामघोष लवलाहो II १ II
अखंड खंडेना जीवन I
रामकृष्ण नारायण II२II
थडी अहिक्य परत्र I
तुका म्हणे सम तीर II३II

अभंग क्रमांक १९६७

रस्त्यावरून आपण चालत आहोत, थोडं निवांत पणे निवांतपणे चालणं चाललय. तेवढ्यात जुने स्नेही अचानक भेटतात. आपण आनंदीत होतो. काय कसं चाललंय तुझं ? तेव्हा उत्तर येते ‘ठीक चालू आहे’. अलीकडचे यंग जनरेशन एकमेकांना भेटले तर ‘मस्त चाललंय’ असे उत्तर येते. पण कोणी असं नाही म्हणू शकत की ‘आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी’ कारण हा शाश्वत स्वरूपाचा निर्भेळ आनंद फक्त तुकाराम महाराजांच्या प्रचितीचा आहे. त्यांच्याही संसारात सुख -दुःख होती पण नामघोषाच्या प्रवाहात त्यांचे जेवण पूर्ण प्रेममय होऊन गेले होते. त्यांच्या जीवनात ‘राम कृष्ण नारायण’ या नामघोषालाच प्राधान्य होते.

ऐहिक व पारतंत्रिक असे दोन्ही पक्ष कल्याण करून घ्यायचे असेल तर जीवनात राम हवा काम नको. काम मर्यादित हवा व कामना खूप नको. विषय सर्वथैव त्याज्य नाही पण विषयासक्त मन नको. त्याचा त्याग संपूर्णतः होत नाही.

आपल्याकडे देवदेवतांनाही आपण आवडीच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतो. जसे गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे. श्रीकृष्णाला लोणी व श्रीखंड अर्पण करतो. श्रीविष्णूला सत्यनारायण प्रत्यर्थ शिरा देतो. शंकराला आपण दुधाचा तर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतो.

संतांच्या बाबतीत ही असे आढळते. रामकृष्ण परमहंसांना जिलेबी आवडत असे. गव्हाची खीर समर्थ रामदास स्वामींना. नाथांच्या घरी रोज पुरणपोळी असे.अक्कलकोट स्वामींना बेसन लाडू आवडत. गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून पिठलं भाकरी कांदा अंबाडीची भाजी सर्वमान्य आहे. एकूणच प्रपंची खाती पिती व परमार्थी काय उपवासी राहती? हे खरंच आहे. आत्मज्ञानी पुरुष, संत, साधू हे सुद्धा कानाने ऐकतात डोळ्याने पाहतात सारे भोग ते भोगतात दिसतात पण त्यापासून ते अलिप्त राहू शकतात. काही मिळाले तरी छान व नाही मिळाले तरी तितकाच आनंद. ही अवघड गोष्ट आहे. आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ताबडतोब कपाळावर आठी येते. प्रत्येक दिवशी दिवसातून एकदा-दोनदा, कित्येक दिवस, महिना आणि वर्ष अशीच गेली तर मग मात्र

“निजीध्यास तो सर्व तुटोनी गेला
बळे अंतरी शोक संताप ठेला
सुखानंद आनंद भेदे बुडाला
मनी निश्चयो सर्व खेदो उडाला”

असा शोक संताप आवरनेसा होतो. असा खूप काळ राहिला तर साधना निष्फळ होऊ शकते म्हणून प्रसन्न मनाची महती खूप आहे. प्रसन्न मनानेच साधना संभवते.

इथं तर संत तुकाराम महाराज म्हणतात प्रेमाने नामघोष चाललाय. साधना आपण शांती तृप्तीसाठी करतो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ‘परमशांत’ होते सारेच संत दर्शनीय असे परम पवित्र परम मंगल व परमशांतीचे अंतरंग अधिकारी असतात. ते आपल्या निजस्वरूपात विश्रांतीत असतात. ते आपल्यासारखेच बोलतात पाहतात ऐकतात पण तरीही ते आत्मस्थित व आत्मरत असतात. त्यांचे ऐहिक व पारमार्थिक जीवन म्हणूनच साधकांना मार्गदर्शक ठरते.

गोंदवलेकर महाराज म्हणत आपण उठा-बसता, उद्योग धंदा करताना जर नाम घेत गेलो तर नामाच्या राशी पडतील. पण आपल्या मनाला हा छंद लागतच नाही. नाना छंदात आपल्या मनाची सारी शक्ती व सामर्थ्य जाते. आपण नामस्मरण करीत नाही त्यामुळे आपण विषयासक्त असे होऊन राहतो आपलं हवेपण संपत नाही. हे जर टाळायचे असेल तर आपण अखंड नामस्मरण केले पाहिजे.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल I
करावा विठ्ठल जीवभाव IIधृ II
येणे सोसे मन जाले हावभरी I
परती माघारी येत नाही II १II
बंधनापासूनि उकलली गाठी I
देता आली मिठी सावकाश II२II
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले I
काम क्रोध केले घर रिते II३II

हे जीवन तुकाराम महाराज जगले. “माझी मज झाले अनावर वाचा I छंद या नामाचा घेतलासे” असे म्हणणारे संतश्रेष्ठ त्यांना या नामातच खरं सुख समाधान लाभले व म्हणूनच निजधामि जाताना त्यांनी जनमानसाला कळकळीची विनंती केली, “येता निजधामी कोणी I विठ्ठल विठ्ठल म्हणा वाणीI” त्यांच्या ह्या वचनांची पूर्ती करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. थोडं नामस्मरण करण्याचा निग्रह धरूया. तशी प्रतिज्ञा करूया. साधुसंतांच्या कृपेनेच हे शक्य आहे अन्यथा नाही कारण जन्म व मरणात फक्त एका श्वासाचे अंतर आहे म्हणून तर गोंदवलेकर महाराज हे म्हणतात,

” नका धरू काही आस Iनाम जपा श्वासोश्वास I”

अस श्वासागणित नाम घेताना सद्भावनेने, सप्रेमाने, सश्रद्धेने नकळत आपणही आनंदाच्या रंगात नाऊन निघू.

श्रीकृष्ण शरणं मम्….

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे. मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.