श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग -30

जोडोनियां धन उत्तम वेव्हारे

जोडोनियां धन उत्तम वव्हारे I
उदास विचारें वेच करी II1II
उत्तम चि गती तो एक पावेल I
उत्तम भोगील जीव खाणी II ध्रु II
पशुपकारी नेणें परनिंदा I
परस्त्रिया सदा बहिणी माया II2II
भूतदया गाईपशूंचे पालन I
तान्हेल्या जीवन वनामाजी II3II
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट I
वाढवी महत्व वडिलांचे II4II
तुका म्हणे हें चि आश्रमाचें फळ I परमपद बळ वैराग्याचें II5II

अभंग क्रमांक २८५४

साक्षात चंद्रमोळी जिथे विश्राम पावला तो गृहस्थाश्रम होय. रामदासस्वामींनीही त्याची ‘धन्यता’, ‘थोरवी’ गायली आहे. तुकोबारायही या गृहस्थाश्रम धर्माची महती तर सांगत आहेत पण तो कसा असावा याचा नेमका व अचूक असा वस्तुपाठ आपल्याला सांगत आहेत. सध्याच्या युगात आयडियल व्यक्ती. त्यातील अतिशय महत्त्वाचे विचार म्हणजे अर्थाजनाविषयी कारण येणंकेन प्रकाराने पैसा मिळवून कोणीही उदरनिर्वाह करू शकत नाही. ते अमान्यच आहे. आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे ते लहान असो मोठे असो ते विधी पूर्वक व व्यवस्थित करून त्या मोबदल्यात जो काही अर्थ म्हणजे पैसा प्राप्त होईल तो उचितच मानला आहे. आपल्या प्रामाणिक कष्टाचा व ज्या अधिकारावर असु त्या संदर्भात जो काही लाभ होतो तो ग्राह्य आहे. आपले व्यवहार स्वच्छ प्रामाणिक व उत्तम मार्गाने केलेले असतील तर जे धन येते ती “लक्ष्मी”च आहे.बाकी सारे गैरव्यवहार हे अलक्ष्मीत जमा होतात. आता मिळालेल्या धनाचा विनियोग ही अहंकाराने न करता न्याय बुद्धीने व विचारपूर्वक करायचा त्यात ताठा असता कामा नये.त्यात पत्नीसाठी एक वाटा, एक मुला बाळांसाठी, एक आई-वडिलांसाठी व एक समाजाचे ॠण फेडण्यासाठी अशी रास्त वाटणी करून व स्वतःचा आदर होण्यासाठी काही भाग निश्चित ठेवून आपण तो अर्थ खर्च केला पाहिजे. त्यामुळे कुटुंब, समाज, राष्ट्र सर्वांचीच घडी नीट राहील.” सर्वे सुखीन: सन्तु” हेच अभिप्रेत आहे.

गृहस्थाश्रमातील धोक्याचा दिवा, लाल सिग्नल तो म्हणजे एक परनिंदा. आपण पापाला खूप घाबरतो व त्यासाठी अधिकाधिक पुण्य करतो. पण परनिंदा हे सर्वात मोठे पाप आहे. प्रत्येक व्यक्तीत उजवे व डावे असते. त्या डावे पणाचा स्फोट करू नये. त्याचबरोबर थोडा तरी परउपकार करावा. जिथे देहाने मदत करू शकू तिथे अवश्य करावी, जिथे मनाने करू शकू तेथे धीर द्यावा, विश्वास दाखवावा. काही ज्ञान विशिष्ट विषयांचे असते त्या विषयात कोणाला मदत हवी असेल तर अवश्य करावी. जिथे पैशाने सहाय्य करू शकू तिथे तेही मान्य आहे. याखेरीज परस्त्री ही आई व बहिणीसारखी मानावी. संतांच्या या भूमिकेत संपूर्ण समाजाची धारणा नीट व्हावी असे विचार त्यांनी समाजापुढे मांडले. लोकशिक्षणाचा फार मोठा वाटा या संत साहित्याने नकळत उचलला.” दया करणे जे पुत्रांसी I तोची दासा आणि दासी I ज्यासि अपंगिता नाही I त्यासी धरी जो हृदयी I” ज्यांना कोणी नाही त्यांना आपले मानणे. अनाथांचा नाथ होणे. रंजलेले गांजलेले आहेत त्यांना मदत करणे हे आपण थोड्या प्रमाणात निश्चित करू शकतो. कारण आपला प्रपंच नेटका करताना सृष्टीतील समग्र घटकांचाही विचार करावा. गोग्रास देणे हा आपल्या संस्कृतीतील अविभाज्य अंग आहे. पशुपक्षी मुक्या जनावरांवर प्रेम करावे. त्यांचे संरक्षण करावे व संवर्धनही. निदान हत्या तरी करू नये .म्हणून खायचे काय व काय खायचे नाही हे ओघानेच ठरवावे लागते.जंगलात वन्य पशु असतात त्यांनाही तहान लागते तेव्हा त्यांच्यासाठी पाणी असावे. शहरात उन्हाळ्यात आपण ठीक ठिकाणी पाणपोई पाहतो. कोणी कोणी चिमणी पाखरांना आवर्जून पाणी ठेवतात. एकूण अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भूतदेपर्यंत आपली मजल जाऊ शकते व त्या सर्वांचा पाया असतो गृहस्थाश्रमातील गृहस्थ व म्हणूनच या आश्रमाची थोरवी अनन्यसाधारण आहे.

प्रत्येक गृहस्थाश्रमी आपले कुळधर्म, कुलाचार नियमित करत असतो. पूर्ण भावानिशी शक्तिनिशी तो ते करत असतो. मग त्यात देवीचे नवरात्र, रामाचे नवरात्र, खंडोबाचे नवरात्र, चंपाषष्ठी, आराध्य दैवत त्याचे पूजन किंवा इष्ट देवता गणराया चे आगमन विसर्जन तसेच महालक्ष्मी, गौरी पूजन हे सारे तो आनंदाने व उत्साहाने साजरे करतो व पुढील पिढीला त्याचे प्रथा परंपरा म्हणून रुढ अर्थाने पालन करायला शिकवतो. यात श्रद्धा- भाव- प्रेम सारे असते. हे पूजन नि:संशय श्रेष्ठ आहे.

याहीखेरीज संत तुकोबाराय म्हणतात, ” कोणाही जिवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे” या परंपरा, प्रथा याबरोबर हा मंत्रही जीवापाड जपला पाहिजे. कोणाचेही वाईट चिंतू नये व मत्सर करू नये. कारण मत्सर नकळत येतो याला मिळाले… मला कसे नाही? पण मस्तर या शत्रूला आपण जाणीवपूर्वक काढून टाकावे म्हणजे भगवंताला पूजा मान्य होते. हा सोपा पण अवघड असा कानमंत्र आहे. फार हवेपण,अट्टहास, लोलोपता नसेल तर सहज शांत स्वभाव बनतो. “कितेक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन” सगळे असते घरदार- शिक्षण -वैभव- प्रतिष्ठा पण आसक्ती नसते. वडिलांची कीर्ति सांगू नये ती वाढवावी की मुलगा वडिलांच्या पुढे दोन पायरी असला हे अंत:करणास समाधान राहते. पण “बाप से बेटा सवाई” हा अहंकाराचा दर्प नसावा. कुळाचे नाव करावे. आई-वडिलांना आदर्शभूत ठरवावे. एकूणच कुल-शील- वैभव सारे सांभाळून नावलौकिक मिळवावा असा विवेक वैराग्य दोन्ही आचरणात आणून आपला प्रपंच संपादन करेल तो उत्तम गतीला प्राप्त होईल यात शंका नाही. संत वचन हे प्रमाण मानावेत व त्यांच्यावर विश्वास ठेवून जीवनाचे मार्गक्रमण केले तर ‘याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा’ हे अशक्य राहणार नाही.

श्रीकृष्ण शरणं मम् 🙏

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.