श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग – 22

 

परिसा नाहीं हीन कोणी अंग

 

चंदनाचे हात पाय ही चंदन I

परिसा नाहीं हीन कोणी अंग II1II

दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार I

सर्वांगें साकर अवघी गोड II ध्रु II

तुका म्हणे तैसा सज्जनापासून I

पाहतां अवगुण मिळे चि ना II2II

 

अभंग क्रमांक 290

 

चंदन सर्वांगाने उपयुक्त असते. त्याचा सुगंध दुरवर पसरतो. ते शितल असते. दाह शांत करते आणि सर्वात विशेष गुण म्हणजे ते झिजते. सहाणेवर चंदन उगाळून देवांच्या कपाळावर तो तिलक लावायचा ही पद्धत पूजा करताना ‘चंदनस्य महत् पुण्यं’ म्हणून सर्वमान्य आहे. सर्व वारकरी मंडळी व भक्त गोपीचंदनाचा टिळा ही लावतात. संत चंदनासारखे असतात.अविश्रांत मेहनत घेतात. लोकांसाठी झिजतात, त्यांना सन्मार्गाला लावतात. तापलेल्या, त्रिविध तापाने पोळलेल्या जीवाला शांत करतात. भक्तीच्या प्रांतात आडमार्गाला लागलेल्यांना सरळ सोपी वाट दाखवतात. बोलण्यासारखे त्यांचे चालणे असते. अवतभोवतीच्या साधकांना, भक्तांना ते सर्वोतपरी मदतच करतात. त्यांची चिंता वाहतात. चंदन आयुर्वेदिक औषध ही आहे. संतही भवरोगापासून मुक्त होण्यासाठी छोटी छोटी साधना सांगतात त्यात नामस्मरण हे प्रभावी व परिणामकारक म्हणून त्याची कास धरा असा आग्रह करतात.

सर्वांभूती भगवद् भाव हा विशेष गुण त्यांच्याकडे असतो. त्याही खेरीज अभय, क्षमा, शांती, दया, प्रसन्नता, संतोष, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा असे अनेक गुण सहज त्यांच्या ठायी वास करतात. मूर्तीमंत सदगुणांचा पुतळा ते बनून जातात.

“कैवल्याचा पुतळा I प्रकटला भूतळा I चैतन्याचा जिव्हाळा I ज्ञानोबा माझा I ” सर्वांचीच माऊली होऊन राहतात.असे हे संत, या संतांचे दर्शन लाभणे हेच खरे पुण्यप्रद होय आणि देहाच्या अंगाने जर त्यांचा प्रत्यक्ष सहवास एखाद्याला लाभला तर सोन्याहून पिवळे असेच म्हणूया.

संत हे परिसरा सारखेच. बोरीच्या सहवासात आले तर चंदन बनते.

“सागराच्या संगे नदी बिघडली”

“नदी बि घडली सागराची झाली” असे बिघडणे हे चांगल्या अर्थाने घडते. संतांच्या सहवासात व्यक्ति सहज चांगली होते. त्यांची प्रत्येक कृती ही वेगळी असते. ते ही जेवण करतात पण ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असा तो यज्ञकर्म असतो. तेही चालतात पण कसे ‘कमळावरती भ्रमर पाय ठेवती हळुवार कुचुंबेल केसर इया शंका’ इतके हळुवार चालतात. ते पाहतात प्रेमाने कासवी सारखे. कासवी केवळ दृष्टीने आपल्या बाळाचे पोषण करते. बोलणे मृदू व गोड असते. दुसऱ्यांचा गुणांचा गौरव करणे व अवगुण दुर्लक्षित करणे असा सन्मान करीत ते सज्जनांची मांदियाळी निर्माण करतात. परोपकारासाठी ते प्रसिद्ध असतात. त्यामुळे आपल्यातही हे गुण नकळत संक्रमित होतात. म्हणून तर रामदास स्वामी म्हणतात, “तिर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी” त्यामुळे तर त्यांच्या ग्रंथाचा सहवासही खूप मोलाचा ठरतो. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, समर्थांचा दासबोध, नाथांचे एकनाथी भागवत व तुकोबारायांची अभंग गाथा हे चार ग्रंथ म्हणजे जणू चार वेद आहेत. सर्वसामान्यांसाठी बहुमोलचे असे आहेत पण त्यांची किंमत आपण ओळखली पाहिजे. संत, साधक, सज्जन ओळखता आले पाहिजेत.

‘अंतरीचा ज्ञानदिवा’ सतत त्यांच्या हृदयात तेवत असतो. ते अंतर्बाह्य ब्रह्मस्वरूप असतात. जीव व शिव यांचे ऐक्य अखंड त्यांच्या ठायी दिसते. ‘जीवा शिवाच्या संगमी नित्य केले

स्नान आम्ही’ असे ते म्हणू शकतात. पवित्र ज्ञान त्यांना झालेले असते. देहोहम् पासून सोहम् पर्यंत त्यांनी प्रवास केलेला असतो. गुरुभजनात तल्लीन झाल्याने अंधकार, अज्ञान, तिमीर, अंधश्रद्धा या गोष्टी आसपासही त्यांच्या फिरकत नाहीत.

तिमीरातून प्रकाशाकडे नेणारे असे ते ज्योतिर्मय असतात. कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, निरूपणाच्या माध्यमातून ते ज्ञानाचा दिवा जनमानसाच्या अंतरात पेटवत राहतात आणि या नामघोषणासह प्रेमाचा प्रवाह त्यांची प्रत्यक्ष अनुभूती ती स्वतः होतात व इतरांनाही देतात. किंबहुना एकदा पवित्र ज्ञानाचा लाभ झाल्यावर त्यांना इतरांशी काय घेणे देणे असते पण तसे ते करत नाहीत. किंबहुना दिवसराती, पुढीलाची सुखउन्नती यासाठी चेतना चिंतामणीचे गाव ते बनुन राहतात. सर्वांचेच ‘कल्पतरू’ होतात मग त्यांच्या कृपा छत्राखाली आलेल्या मंडळींना काय कमी पडणार? खरंच त्यांचा उद्धार होतो.

एखाद्या वस्तूची गोडी कळायला ती वस्तु खाऊन पहावी लागते. ‘जिलेबी’, ‘साखर’ नुसते गोड पदार्थ त्यांची नावे घेऊन अनुभव येत नाही प्रत्यक्ष जिलेबी चा एक तुकडा खाल्ला की आपण म्हणतो अहाहा.. अप्रतिम. म्हणूनच नुसते वाचून, लिहून, ऐकून, बोलून त्या परम तत्त्वाचा ‘सत्-चित्- आनंद’ स्वरूपाचा बोध कधीही होत नाही. केवळ बोलण्याचे हे शास्त्र नाही. जो जिद्दीने या वाटेवरून चालेल तो संसार जिंकल्याशिवाय राहणार नाही. पण तशी चिकाटी मात्र हवी. शिर्डीला सत्य साईबाबा आहेत, गोंदवले येथे ब्रह्मचैतन्य आहेत, अक्कलकोटला स्वामी समर्थ, बेळगावला कलावती आई, शेगावला गजानन महाराज,आळंदीला माऊली आहे. “साधू दिसती वेगळाले I पण ते स्वरूपी मिळाले I अवघे मिळूनी एकच झाले I देहातीत वस्तू I ” सगळ्यांचे सांगणे एकच असते प्रामाणिकपणे केलेले कर्तव्यपुर्ती व ईश्वराचे अनुसंधान हे साधण्याचा जो प्रयत्न करतो तोच सज्जन तोच साधक व पुढे तोच साधू होतो. नराचा नारायण होतो व त्याच्या नुसत्या दर्शनाने अतीव सुखलाभ होतो.

कारण त्यांच्याकडे पाहिले तर तरी लक्षात येते दर्शनाचीया प्रशस्ती पुण्यपुरुष म्हणूनच म्हणतात, “समाधान ते साधूचेनि योगे”

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका-भाग्यरेखा पाटोळे

             कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.