श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग – 21

सर्व सिद्धीचे कारण

 

मन करा रे प्रसन्न I

सर्व सिद्धीचें कारण I

मोक्ष अथवा बंधन I

सुख समाधान इच्छा ते II1II

मनें प्रतिमा स्थापिली I

मनें मना पूजा केली I

मनें इच्छा पुरविली I

मन माऊली सकळांची II ध्रु II

मन गुरु आणि शिष्य I

करी आपुलें चि दास्य I

प्रसन्न आपआपणास I

गति अथवा अधोगति II2II

साधक वाचक पंडित I

श्रोते वक्ते ऐका मात I

नाहीं नाहीं आनुदैवत I

तुका म्हणे दुसरें II3II

 

अभंग क्रमांक 291

 

‘आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात’ असं बहिणाबाई चौधरी आपल्या काव्यात म्हणतात. खरंच क्षणात आपलं मन अमेरिकेतल्या लेकाच्या किंवा लेकीच्या घरी जाऊन येते. ते अचपळ आहे तसेच शक्तिशाली आहे. त्याला ज्याची गोडी लावावी, सवय लावावी तसे ते कार्यही करते. कधी कधी ते सुता सारखे सरळ असते. तेव्हा वाटते माझ्यासारखा मीच सुखी, मीच आनंदी. कधीकधी ते इतका व्याप करते की म्हणतात ना ‘मन चिंती ते वैरी न चिंती’. कधी कधी इतकं अस्वस्थ करून सोडते की आपण म्हणतो “काल काय झालं कोण जाणे डोळ्याला डोळा लागला नाही” हेच ते बागुलबुवासारखं भिती घालणारे मन. डोळ्यांना तर दिसत नाही पण वेग मात्र वाऱ्यासारखा. सर्व इंद्रियात मन हे न दिसणारे पण श्रेष्ठ आहे. म्हणून तुकाराम महाराज या मनाला ‘मनमाऊली’ म्हणतात मन ताब्यात नसतं हे खरं. हातावर तुरी देऊन ते निसटत. सहज आपण आपल्याला चिमटा काढावा व पहावा काय मन विचार करतन? मुलगा व्रात्य व वांड असला तरी त्याची माऊली गोड बोलून, प्रसंगी धपाटा घालून संभाळते. तसेच या मनाचे सामर्थ्य संत-महंतांनी ओळखले होते. ते साध्य नाही पण साधन श्रेष्ठ आहे. त्याचा हात धरूनच आपण पारमार्थिक शिखर गाठू शकतो. मनाला नामस्मरणाचे, ध्यानाचे, सदग्रंथांच्या वाचनाचे, चिंतन, मननाची हळूहळू गोडी व शिस्त लावावी लागते. अमुक वेळेस अर्धा तास बसायचं, नामाची बैठक घ्यायची की ते ऐकते. असं नाही म्हणायचे की ‘साधं पोहता येत नाही भवसागर वगैरे तरणं दूरच. आपलं काम नाही.’ आपलंच काम आहे उलट अशी आपणच आपल्याला ग्वाही द्यायची. मन प्रसन्न, शांत, स्वस्थ, आनंदी ठेवायच. त्याला जाणीवपूर्वक सवय लावायची चांगल्या गोष्टींची आवड लावायची, थोडे नाम घ्यायचे, थोडे भजन करायचे, काही अभंग म्हणायचे, थोड निरूपण ऐकायचे, ज्ञानेश्वरी वाचन करायचे. चोवीस तासातील दोन तास यासाठी निग्रहान काढायचे. हळूहळू काही वर्षांनी चित्त प्रसन्न होऊ लागते. मग स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसे,”असो द्यावे चित्त प्रसन्न I भगवंती निष्ठा पूर्ण I तो संकटी सत्वर धावुनि I घाली आनंदमेळी स्वस्वरूपाच्या I ” हे पटण्यासाठी मनोभूमिका तयार होते. मन म्हणजे अखंड संकल्प व विकल्प. ज्ञानेश्वर माऊलींनी तर मन नाहीच असे प्रतिपादन केले. तर “प्राणी संकल्पे बांधला I न सांगताचि बद्ध झाला I तो विवेके मुक्त केला I साधुजनि ”

 

आपण आपल्याला संसारात बद्ध समजतो. रहाटगाडग्यात अडकलो अशी कल्पना असते. आता हा भवसागर कसा पार करणार अशी चिंता वाटते.वस्तूत: हे भय नसावे. पण संतच त्याला विवेकाने बाजूला करतात व निव्वळ आत्म प्रचितीचा अनुभव घेतात. ज्ञान काय ते समजून घेतात. जनमानसाला मार्गदर्शन करतात. स्वतः तरतात व अनेकांना तरुन नेतात कारण ‘रामनाम’ नौका त्यांच्या भक्तांसाठी तयार असते. रामराया पैलपार नेणारच हा दृढ विश्वास असतो. संत तुकोबाराय ही म्हणतात मन प्रसन्न करा सर्व सिद्धीचे ते कारण आहे. मोक्षाला व बंधनाला तेच कारणीभूत होते. नाहीतर ज्ञान होणे अवघड नाही पण आपल्यालाच समजुती व गैरेसमजुती, श्रद्धा- अंधश्रद्धा, आपले संस्कार, आपल्या अनुवंशिकतेमुळे झालेली मनाची जडणघडण हे सर्व शुद्ध ज्ञानाच्या आड येते. पण ते अवघड नाही. मनाला वळण लावले तर असाध्य ते साध्य नक्की होते. तसा अनुभव आहे. सर्व संतांनी सत्-चित्- आनंद स्वरूप अशा परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व सगुण रूपातही भगवंताचे दर्शन त्यांना लाभले.*”पैलआले हरी शंखचक्रपद्म धरी” चतुर्भुज रूपात श्रीहरी त्यांनी पाहिला.रोजच्या दैनंदिन जीवनात कर्म करीत असताना मनच रामरूप झाल्याने कबीराचे “विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम I भाबड्या या भक्तासाठी देव करी काम” असे प्रचितीचे उद्गार सहज त्यांच्या मुखातून आले.

 

आपली गती-अधोगती सर्व मनावर अवलंबून असते.माणूस सवयीचा गुलाम आहे हे तर सर्वच जण मान्य करतात. आपण दुपारी चार वाजता पत्ते खेळायला क्लब मध्ये जात असु तर पावले त्या दिशेने पडतात व त्याच मनाला मंदिरात हरिकथा निरूपण ऐकायची सवय लावली तर पाउलं मंदिराच्या दिशेने जाते.मन आपल्या ताब्यात असेल तर तेच ‘दास्यत्व’ ही करते म्हणजे चांगल्या गोष्टीही ते करून घेते. “प्रसन्न मन गगनी रिघता I गगनरूप होते सर्वथा I त्या गगनाचा मी द्रष्टा I ऐसे कळता I साक्षीत्व अवस्था प्राप्त होय ” असे साक्षीत्व पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी अनुभवले.

 

काही काळ असा अभ्यास झाल्यावर मन अनुसंधान साधायला शिकते. नाना उपभोग घेतानाही त्याला ‘निजात्मसत्ता’ आठवत राहते. यासाठी नोकरी सोडायची नाही, बायको-मुले घरदार सोडून अरंण्यात जायचे नाही. म्हणूनच अतिशय ठामपणे महाराज सर्व साधाकांना,वाचकांना, पंडितांना, श्रोत्यांना,वक्त्यांना व अन्य सर्वसामान्य जनमानसालाही सांगत आहेत “मन प्रसन्न करा. व त्यानंतर ठायीच बैसोनी करा एकचित्त I आवडी अनंता आळवावा I” दुसरे कुठलेही कष्ट किंवा अवांतर साधना करण्याच्या वाटेला जाऊ नका. मानसपुजा सहज घडते कुठल्याही उपकरणाची गरज भासत नाही.”आमुप जोडल्या सुखाचीया राशी I पार त्या भाग्यसी नाही आता I” अशी उत्तम अवस्था याची जन्मी अनुभवण्यास मिळते.

 

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे

              कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.