श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग-19

 

जया अंगी मोठेपणा

 

लहानपण देगा देवा I

मुंगी साखरेचा रवा II1II

ऐरावत रत्न थोर I

तया अंकुशाचा मार II II

ज्याचे अंगी मोठेपण I

तया यातना कठीण II2II

तुका म्हणे जाण I

व्हावे लहानाहुनी लहान II3II

 

अभंग क्रमांक –1277

 

‘मुंगी होऊन साखर खावी’ अशा आशयाची म्हण सर्व प्रचलित आहे. त्यात जो अर्थ दडलेला आहे त्यातील काही अंश या अभंगातही दडलेला आहे. मुंगी लहान असते पण तिच्या मुखात असतो साखरेचा कण.त्यामुळे साखरेचा कण थोडा जरी असला तरी तिथे मुंगी लगेच येते हा आपलाही अनुभव असतो. मुंगीला गोड घास नेहमीच प्राप्त होतो. आपलं लहानपण हे असेच रम्य ,आनंदी, खेळण्या-बागडण्यात आई -वडील सांभाळ करतात त्यामुळे निर्धास्तपणे जाते. कोठे काही उणीव नसते. कोणी चुकून रागावले तरी गोड खाऊही लगेच मिळतो. आपल्या ठायी असलेली निरागसता मोठ्यांना हवीहवीशी वाटते.त्याच्या मोबदल्यात भरभरून प्रेम हे त्या लहानग्या जिवांना मिळते. असं लहानपण वय वाढल्या नंतरही आपण जपून ठेवावे. व्यक्ति किती कर्तबगार उमदे व्यक्तिमत्व असली तरी खेळकर व प्रसन्न व्यक्तिमत्व अधिक लोकांचे मन जिंकून घेते.

 

‘Low ambition is crime’असेही म्हणतात. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व उत्तुंग बनवण्याचा आपण प्रयत्न नक्की करावा फक्त आपली वृत्ती निरागस ठेवावी. “ध्येय असावे सुदूर कधी न हाता यावे I मार्गधारे परी तयाच्या प्रकाशात चालावे I” ज्या ज्या व्यक्तिमत्त्वांनी उंची गाठली त्या त्या सर्वांनाच यातना या झाल्याच. मग ते देशसेवक असोत, समाजसेवक असोत, कलाकार असोत किंवा साधुसंत असोत त्यांनी आपले सर्व आयुष्य पणाला लावलेले असते, समर्पण केलेले असते. त्यांचा जीवनपट हा आदर्श ठरतो म्हणून तर आपण आजही त्यांच्या जयंती व पुण्यतिथी या साजरी करत असतो.

 

कठीण परिस्थितीत मार्ग काढून आपल्या ध्येयापासून न ढळता आयुष्य क्रमण करावे लागते. ज्ञानेश्वर माऊलींचा काय कमी छळ झाला. तत्कालीन समाज व्यवस्था व कर्मठ मंडळी यांनी साधे मांडे भाजायला खापरही त्यांना दिले नाही हा दाखला पुरेसा आहे. पण ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ग्रंथ लिहून गीतार्थाचे आवार त्यांनी सर्वसामान्यांना खुले केले. माऊली जगताची ते होऊन राहिले. आजही 725 जयंती आपण श्रद्धापूर्वक साजरी करतो व ‘माऊली ज्ञानराज माऊली’ असा त्यांच्या नामाचा उद्घोषही ही करतो.

 

रामदास स्वामी तर एकदा भिक्षा मागण्यास एका घरी गेले. तेव्हा शेणाच्या पोतारे त्यांच्या मुखावर टाकून एका गृहिणीने त्यांची अवहेलना केली. तेव्हा तेच पोतेरे, त्यातील धाग्यांच्या वाती बनवून रामरायाला त्यांनी प्रार्थना केली ‘बुद्धी दे रघुनायका’. अपराधी जन चुकीच्या मार्गाने चाललय त्यांना तुच सद्बुद्धी दे. आजही आपण अभिमानाने म्हणतो “जय जय रघुवीर समर्थ”.

 

एकनाथ महाराज तर प्रत्येक कृतीतून ‘शांतीब्रह्म’ ‘शांतीधाम’ म्हणूनच पुढे येतात. तर दृष्ट रामेश्वरभट्टांनी तुकोबारायांची संपूर्ण अभंग गाथा पाण्यात सोडून दिली. तरीही ती तशीच्या तशी वर आली हे सर्वज्ञात आहे. ते अभंग खऱ्या अर्थाने ‘अभंग’ ठरले. उत्तम मार्गदर्शन करणारे हे अभंग भक्तांच्या गळ्यातील ताईत बनले.

 

‘जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण’ हे सांगायला नको. अनेक देशसेवक लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, शिक्षण क्षेत्रात कामाची सुरुवात करणारे ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, मराठ्यांचा झेंडा अटकेपार लावणारे छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, हेच इतिहासाचा विषय होतात. कलाक्षेत्रातील मान्यवर कलावंतही याला अपवाद नाहीत. आनंदवन निर्माण करणारे बाबा आमटे तर व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे अनिल अवचट असा अनेकांचा उल्लेख करावा लागेल. एकूणच या साऱ्या व्यक्ती गौरवास्पद व कौतुकास्पद कार्य करणाऱ्या असल्या व त्यांचे सन्मान झालेही पण त्यांच्या ठायी कुठलाही गर्व, ताठा, अभिमान ,अहंकार याचा स्पर्श झालेला आढळत नाही. लहानाहून लहान होणे ते हेच. हळू बोलणे, हळू चालणे, कुणाच्याही अंतकरण न दुखावणे हा त्यांचा सहज स्वभाव बनवून राहतो.

“विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा I करी माझी सेवा जीवभावे I” अशी मनापासून उदंड कर्म करूनही ते अलिप्त राहू शकतात. जो स्वतःला दास म्हणावितो किंवा भक्त म्हणवितो त्याच्या हातूनच अलौकिक कार्य घडते. जसे आपले हनुमंतराय हृदयातच ‘राम’ त्यामुळे लंका दहन सहज शक्य. “कर्ता करविता एक भगवंत आपण त्याचे लेकरू” हा भावही खूप फलदायी ठरतो कारण माऊली आपल्या लेकरांचे सर्वस्वी हितच चिंतते, कल्याणच करते. तसेच “घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी” पिलाचा सर्वस्वी भार ती घेते. इतका मोठेपण त्या लहान होण्यात दडलेले असते.

 

म्हणून तुकोबा राय म्हणतात नम्र व्हा, लहान व्हा, भक्त बना, शरणागत व्हा, मोठ्यांच्या चरणांवर पुन्हा पुन्हा माथा ठेवा, नतमस्तक व्हा याहून अवघड साधना नको, उपासना मार्ग नको. फक्त भावाने करा,”मनी नाही भाव आणि देवा मला पाव” हे शक्य होणार नाही. तुकडोजी महाराज म्हणतात तसे ‘देव बाजारचा भाजीपाला नाही’ तो विकत घेता येणार नाही. इथे भाव कमी जास्त करता येणार नाही.

 

जे काही थोरपण वाट्यला आलेलं आहे, लाभलेल आहे ते सारी त्याचीच कृपा आहे. त्याच्या शब्दात सांगायचे झाले तर,” मज पामराशी काय थोरपण I पायीची वहाण पायी बरी I ” हाच तुकोबारायांचा भाव आपणही साधना करताना जपूया.

 

श्रीकृष्ण शरणं मम् …..

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे

               कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.