श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग- 18

काळ ब्रह्मानंदे सरे

संसार तो कोण देखे I
आम्हां सखे हरिजन II1II
काळ भ्रमानंद सरे I
आवडी उरे संचली II ध्रु II
स्वप्नीं ते ही नाहीं चिंता I
रात्री जातां दिवस II2II
तुका म्हणे ब्रह्मरसे I
होय सरिसें भोजन II3II

अभंग क्रमांक– 1272

जीव जन्माला आला की संसार हा सुरू होतोच. बाल -तरुण- वृद्ध अवस्थेतून जीव जातो. संसार स्वरूप बदलते पण तो असतोच. संत मंडळींनाही संसार असतो. पण जन्म व मृत्यू यामधील काळात असे विशिष्ट पद्धतीने जीवन जगतात की कृतार्थता, धन्यता, परिपूर्णता, आनंद, आत्मनिर्भरता या स्थितीला ते सहज प्राप्त होतात.सर्व संतांचे चेहरे आपण प्रतिमेत आजही पाहतो ते शांत, प्रसन्न, तृप्त व समाधानीच दिसतात. एक विलक्षण तेजोवलय त्यांच्याभोवती असते. मग ते एकनाथ महाराज असो रामदास स्वामी संतश्रेष्ठ तुकोबाराय असो किंवा नामदेव महाराज असो आयुष्यभर त्यांनी ब्रह्मसत्य व जगत् मिथ्या वाक्याचे चिंतन केलेले असते. परमात्मा ही एकच वस्तू सत्य आहे व बाकी अवस्तु आहेत या एकाच प्रेरणेने ते प्रेरित होऊन जीवन व्यतीत करतात.

कथा करतील ती भगवंताची. कथा ऐकतील ती भगवंताची. चिंतन करतील ते भगवंताचेच. कीर्तन करताना त्यांची संपूर्ण काया जणू ब्रह्मरूप झालेली असते. देव व भक्त असे द्वैत न राहता नादातच पावुन ते कीर्तनात रंग भरत असतात. त्यामुळे वक्ता व श्रोता जणू दोघेही रामरुपच होऊन जातात.

पण याची सुरुवात अगदी साध्या वाटणाऱ्या कर्मापासुनच ते करतात व ते कर्म महान ठरते. दासी जनाबाई पहा ना दळण दळता ‘विठूला’ एक क्षणही दूर करायची नाही “दळिता कांडिता तुज गाईन अनंता” त्यामुळे ती ज्या शेणाच्या गोवर्या थापायची त्यातूनही ‘विठ्ठल’ ‘विठ्ठल’ असा ध्वनी निघायचा. कर्मे ‘कृष्णार्पण’ करणे ते हेच होय. संतांची, भक्तांची कर्म ही सहज ‘कृष्णार्पण’ ठरतात. त्यांचे भोजनही “ब्रम्हार्पण ब्रह्म हवि ब्रह्माग्नो हुतम्” असे असते. त्यांचे चालणेही तीर्थयात्रा होते. ते बोलतात तेव्हा विठ्ठल साक्षात डोलतात. “चालता बोलता न मोडे आसन न I भंगे ते मौन कदाकाळी I” असे पावसचे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. त्यांच्या प्रत्येक कृतीत भगवंत त्यांच्याबरोबरच राहतो. या काही केवळ रंजक गोष्टी नाहीत तर ते भक्तीचे परमोच्च शिखर आहे.म्हणून तर नामदेवांचा नैवेद्य विठूमाऊलीने ग्रहण केला. तर स्वामी रामदास यांच्याबरोबर हनुमंतराय प्रत्यक्ष जेवले. कलावतीआई सोबत यदुरायाने लाडू खाल्ला. ‘शिवंभूत्वा’ ‘शिवंयजेत अशी ही उंच पातळीवरची भक्ती आहे. ती सहज संतांच्या जीवनात अवतरलेली असते.

त्यामुळे क्लेश, चिंता, भय, दुःख याचा मागुमुसही नसल्याने त्यांनी घेतलेली झोप ही ‘सुखाची निद्रा’ ठरते. सर्वसामान्य माणसाचे उलट असते तो झोपेसाठी,झोपेच्या सुखासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण करतो. फोमची गादी, सुंदर पंखा, मंद दिव्याचा प्रकाश, मधुर संगीत पण रात्री एखादे भीतीदायक स्वप्न पडले तर तो दचकून उठतो व पेलाभर पाणी पितो असे होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक दिवसाला ‘भजगोविंदम्’ ‘भजगोविंदम्’ या न्यायाने आपली उपासना घडते की नाही याच आत्मपरीक्षण करायला हवे असते.

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग इथून आपली सुरुवात होते. यात गैर काही नाही ती वस्तुस्थिती असते व स्वीकारावीही लागते. पण “काळ ब्रह्मानंदे सरे” हे आपलंही उद्दिष्ट व्हावे. समत्व वृत्ती अंगी बाणवणे हा फार मोठा अभ्यास आहे. संतांच्या जीवन तपशीलातून आपण ते पाहिले पाहिजे. श्रीखंड पुरी जितक्या आनंदाने खातात तितक्याच आनंदाने ते पिठलं भाकरीही खातात. कारण अंर्तंबाह्य मूर्तीमंत ब्रह्म त्यांनी अनुभवलेले असते. घेई आपोषण ब्रम्हांडाचे हे ही स्वप्रचितीचे असते. मुंगी आणि माशी येथे एकच नारायण आहे हा बोध पक्का असतो. त्यामुळे रात्री पाठीमागून दिवस येतो दिवसा मागून रात्र येते. पण त्यांचा हा सर्व काळच ब्रह्मानंदात जातो. संत तुकाराम महाराज तर म्हणतात, आमच्या घरी ‘श्रीकृष्ण’ ‘श्रीधर’ नावाची एक गाय आहे. कामधेनुच आहे. तिचा पान्हा त्रिभुवनाला पुरतो व चौदा भुवने या वसुंधरेवर चारा सुखाने चरतात. तिन्ही लोकांचा जो सांभाळ करतो तिथे आपली भूक काय भागणार नाही का? त्यामुळे स्वतःचे पोट कसे भरेल याची का चिंता करावी?

मी काय कुणाचे खातो हा राम आम्हाला देतो असाच साऱ्या संतांचा श्रेष्ठ उपासकांचा व भक्तांचा भाव असतो व त्यांचे भोजनही स्वतःपुरते पुरतेच नसते तर तो प्रसाद ठरतो. आजही भंडारा या संज्ञेखाली अनेक मंदिरात आपण कित्येक लोकप्रसादाच्या वेळी प्रसाद ग्रहण करून जातात हे पाहतो. त्यावेळी दर्शनास आलेले सारे भक्तच ते घेतात एकही भक्त विन्मुख माघारी जात नाही. ही सारी लीला आजही आपण अनुभवतो. तीर्थांच्या ठिकाणी, संतांच्या मंदिरात देवाच्या दारात हा यज्ञ अखंड चालू असतो.

संतांच्या सहवासात अखंड नामस्मरण, अखंड ज्ञान, अखंड सत्संग, अखंड कीर्तन यामुळे ब्रह्मानंदात टाळ्या वाजत राहतात. प्रसादाचे भोजन ही यथेच्छ लाभते. एकूणच सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला अशी स्थिती होते. मागे-पुढे, आत- बाहेर एक आनंदच कोंदुन राहायला आहे असा अनुभव येतो. कारण जीवाने गोविंदाची जर आवड धरली असेल व सेवाभावाने वर्तन घडत असेल व आपण आपले कर्म यथासांग करत असु तर भगवंत भोजनाच्या वेळेस पंगतीलाही बसतील व त्यांची संगत ही लाभेल. हाच खरा जीवनातला अलभ्य लाभ.

श्रीकृष्ण शरणं मम् ….

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.