श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख 

अभंग -15

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार

 

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती I चालविसी हाती धरुनिया II1II

चालो वाटे आम्ही तुझाच आधार I चालविसी भार सवे माझा II II

बोलों जातां बरळ करिसी तें नीट I

नेली लाज धीट केलों देवा II2II

अवघें जन मज जाले लोकपाळ I

 सोइरे सगळ प्राणसखे II3II

तुका म्हणे आतां खेळतो कौतुकें I

 जालें तुझें सुख अंतर्बाहीं II4II

 

नुकतेच चालायला लागलेले लहान मुल पाऊल टाकते ते बाबांचा किंवा आईचा हात धरून विश्वासाने पण निश्चिंतपणे .तसेच संतश्रेष्ठ तुकोबारायांचा भाव असा होता की, *”तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची”*. लडिवाळे ते स्वतःला देवाचे बाळ संबोधतात. ही अवघड गोष्ट आहे. ‘सारे काही भगवंताचे मी त्याचा’ हे म्हणणे सोपे आहे पण आचरणात आणणे कठीण आहे. संतांचा भाव ‘विठू माझा लेकुरवाळा’ असाच असतो. आम्ही देवाची लेकरे आहोत त्यांच्याच अंगा खांद्यावर खेळतो जणू तो ‘विठूच’आम्हाला संभाळतो व आमचा हात धरून चालवतो हा दृढ विश्वास व श्रद्धा त्यांची असते. किंबहुना,

चालते शरीर कोणाची या सत्ते कोण बोलावितो हरीविण I

देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका I

ही पक्की खूणगाठ त्यांना मान्य असते. त्यामुळे कर्तेपण ते स्वतःकडे कधीही घेत नाही. सर्वसामान्य जन ‘मी यांव केले मी त्यांव केले’ असे म्हणत राहतो पण “आहे तितुके देवाचे Iऐसे वर्तणे निश्चियाचे I” त्यामुळे साधू संतांजवळ उद्वेग नसतो. “खेळवीसी तैसा खेळण साचार तूच सूत्रधार बाहुले मी

याचा स्वीकार त्यांनी केलेला असतो. रामदास स्वामी ही प्रतिपादतात,”मी कर्ता ऐसे म्हणशी I त्याने तु कष्टी होशी I राम कर्ता म्हणता पावशी यश कीर्ती प्रता I” सारे सत् शिष्य सद्गुरुला पूर्ण शरण आलेले असतात किंवा भगवंत चरणी अनन्यशरण असतात. त्यामुळे स्वाभाविक त्यांची सारी चिंता भगवंत वाहत असतो. लहान बालकाला जशी आई वाढविते. आपला ‘बबड्या’ कसा आहे ते तिला ठाऊक असते. ती कधी गोंजारते,कधी रागवते, कधी अबोला धरते, कधी बक्षीस देते. असे नाना मार्गाने प्रयत्न करून ती बालक घडविते. इथे भगवंत भक्ताचा हात कधीही धरलेला सोडत नाही. एखाद वेळेस भक्त चुकेल काही अवगुण त्याच्याकडे राहील पण निजभक्ताला जवळ घेतलेला तो कधीही दूर लुटत नाही.

 

या मार्गावरून जे चालणं होते ते त्याच्या आधारामुळे, त्याच्याच कृपेमुळे, आशीर्वादामुळे. अन्यथा ही बाब सोपी नाही. रोजच्या दैनंदिन जीवनात ही आपणा सर्वसामान्य मंडळींना अनेक गोष्टींचा आधार वाटतो. अगदी आपल्याला मदत करणारी बाई, आपले वाहन दोन चाकी असो चार चाकी असो,आपले शेजारी, आपला वाणसामानवाला, अगदी आपली बीपी ची गोळी सुद्धा. याहून पुढे जाऊन आपले शिक्षण, आपली नोकरी,आपले आत्मस्वकीय याचा जीवन सुसूत्र चालण्यामध्ये खुप वाटा असतो.

 

पण खरा सूत्रधार तो ‘विश्वंभर’आहे. जगन्नियंता, परमात्मा, परमेश्वरच आहे. त्याच्या भेटीसाठी आपण उत्सुक असु तर तो मात्र आपण चार पावले त्याच्या दिशेने टाकले तर तो स्वतः आठ पावले आपल्याकडे येतो. असं हे गणित असते म्हणून तर ‘अनंत’, ‘दयाधन’, ‘कृपासिंधू’, ‘करुणाधन’ हे त्याचे सार्थ विश्लेषण असते. आपण जेव्हा शून्यातून विश्व निर्माण करतो तेव्हा आई-वडिलांचे संस्कार,त्यांनी दिलेला सुदृढ देह, आपला शिक्षक वर्ग, नोकरीतील वरिष्ठवर्ग या सर्वांविषयीची कृतज्ञता आपण मान्य करावी लागते किंबहुना आपण करतो ही व याच्याच पुढची पायरी ‘त्याच्या’ कृपेने झाली ही प्रगती हे मान्य असणे. ज्याच्यावर भगवंताची, संतांची साक्षात कृपा असते, विशेष कृपा असते त्यांच्या प्रगतीचा आलेख अधिक असतो. कारण फार मोठी शक्ती व सामर्थ्य असलेल्या अनाथांचा नाथ असलेल्या व विश्रामाचा विश्राम असल्याने तो रघुनंदन भक्तांसाठी कामधेनु होऊन राहतो. युग अठ्ठावीस विटेवर उभे राहून रात्रंदिवस भक्तांची चिंता वाहतो.

 

भक्तांच्या मुखात निरंतर नामस्मरण राहावे याची तेच काळजी वाहतात. एवढेच नाहीतर *”वेदांचा अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा”* इतके आत्मविश्वासाने ते म्हणू शकतात. तृष्णेच्या धावा खुंटून जातात. सगळीकडे शांतीच शांतीचा अनुभव येतो.आयुष्य म्हणजे कौतुकानं खेळणे होते. त्या भगवंताकडे अन्य काही गोष्टी मागितल्या नाही त्यामुळे त्याच्या चरणाशीच पूर्ण सुख आहे याचा प्रत्यय मात्र येतो. जीवन कृतार्थ व धन्य होते.

 

अवघे जन,माता- पिता,बंधू -सखा सारे सज्जन विठ्ठलमय होऊन जातात. विठ्ठल स्वरूप दिसतात. जेथे जातो तेथे विठ्ठल दर्शन. विठ्ठलाचे हात दिलेला मग भय कसले?चिंता कुठली? या विठ्ठल भक्ताच्या घरी चारी मुक्ती जणु पाणी भरत असतात.*” तुका म्हणे मुक्ती परिणीती नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी”* स्पर्धा नाही, कोणाचा मत्सर नाही, काही हवेपणा नाही. तो अंतरबाह्य सुखी असतो.सगुण निर्गुण दोन्ही त्याने अनुभवलेले असते. आनंदनिर्भर असा तो दास असतो. अवघे अलंकार जणू अंगावर तो परिधान केलेला असतो. तो छाती ठोकपणे म्हणतो, *”हरीच्या दासा चिंता हे तो अघटीत वार्ता I खावे प्यावे,ल्यावे I तुका म्हणे पुरवावे I “*

 

श्रीकृष्ण शरणम् मम् ……

 

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.