लोकशाही समुहातर्फे तीर्थंकर महावीर आकर्षक पुस्तिका

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील मीडिया क्षेत्रातील गणमान्य संस्था लोकशाही समूहाने भगवान महावीर यांचा 2621 वा जन्म कल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीर्थंकर महावीर या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती लोकशाही समूहाचे सल्लागार संपादक धो.ज. गुरव यांनी दिली. तीर्थंकर महावीर ही पुस्तिका जळगाव जिल्हा आणि जैन मुनी विषयावर केंद्रीभूत राहणार असल्याचे गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून जेष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल आणि महाव्यवस्थापक सुभाष गोळेसर कार्यरत आहे.

महान तीर्थंकराच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य लक्षात घेऊन जैन धर्म आणि अखिल मानव कल्याणासंदर्भात “जैन मुनी आणि जळगाव ” असा गेल्या शंभर वर्षांचा प्रवास विशेषांकाच्या स्वरूपात मांडण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या शंभर वर्षाच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात चातुर्मासात येऊन गेलेले जैन मुनी, आचार्य, आर्यींका, जळगाव जिल्ह्यातून ज्यांनी जैन मुनी म्हणून दीक्षा घेतली त्या महानुभवांचा परिवारासह परिचय, खान्देशात संपन्न झालेले दीक्षांत समारंभ, जळगाव जिल्ह्यातील सर्वच जैन मंदिरांचा इतिहास, संथारा व्रत धारण केलेले जळगाव जिल्ह्यातील जैन बंधू, भगिनी आणि त्यांच्या परिवाराची सविस्तर माहिती, जैन संघटनांचे सामाजिक, धार्मिक कार्य, खान्देशातील एकूणच समाज जडणघडणीमधील जैनांचे योगदान या शिवाय काही प्रासंगिक व प्रेरक घटना, कार्यक्रमाची माहिती असलेले लेख आदींचा यात अंतर्भाव असेल.

जैनेतर म्हणजेच इतर धर्मियांना विशेषतः तरुण पिढीस जैन धर्मियांच्या संत परंपरेची, तत्वज्ञानाची माहिती व्हावी व तो एक खान्देशचा एक धार्मिक ठेवा व्हावा, या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती समन्वयक सुरेश उज्जैनवाल यांनी दिली. तीर्थंकर महावीर या बहुआयामी प्रकल्पाचे समाजातील मान्यवरांनी कौतुक केले असून लोकशाही समूहाचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.