‘ते’ चार दिवस

0

लोकशाही विशेष लेख

 

(भाग एक)
पाळी ही शारिरिक अपघात नसून ही एक सहज घडणारी नैसर्गिक क्रिया आहे. जी स्त्री मधल्या स्त्रीत्वाला जन्म देते. मात्र आजही मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अस्पृश्य ठरविणे किंवा घरकामातून विश्रांतीच्या नावाखाली इतर कामाला जुंपणे हे सगळेच दाभिक व खोटारडेपणाचे लक्षण आहे. मातृत्व ही फक्त महिलांनांच मिळालेली निर्सदत्त देणगी आहे. ह्याच देणगीची नैसर्गिक सुरूवात म्हणजे मासिक पाळी. यात गैर, पाप, विटाळ हे कोणी पेरंल? सती, केशवपन, बालविवाह, हुंडा अशा बुरसटलेल्या रुढी-परंपरांना आपण फाटा दिला. त्या बंद करण्यासाठी आंदोलने, प्रयत्न व कायदे देखील केले. मग पाळीच्या विषयावर आपण अजूनही मागासलेले विचार घेऊन का जगत आहोत? ‘पाळी आली आहे ना; मग मंदिरात जाऊ नकोस, देव घरात जाऊ नकोस, प्रसाद खाऊ नकोस, कोणाला शिवू नकोस किंवा हात लावू नकोस, स्वयंपाक घरात शिरायच नाही, चार पाच दिवस वेगळंच राहयचं’ आणि विशेष महत्वाचे म्हणजे लोणच्याच्या बरणीला अजिबात हात लावायचा नाही, कारण ते नासेल. लोणचं नसेल कि नाही माहित नाही पण पण लोकांचे विचार मात्र नासलेले आहेत हे यातून दिसून येते.

पाचव्या दिवशी पाळी थांबली की, अंघोळ करायची आणि शुध्द व्हायचं. ओ गॉड… बस….. आता वैताग आलाय त्याच… त्याच त्या रटाळवाण्या गोष्टी.. कमाल वाटते या समाजाची. एकविसाव्या शतकात वावरतांना आजही या सर्व गोष्टी सर्रासपणे चालू आहेत. खरं तर आपण जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुध्द आणि विटाळ मानतो. या नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा? आजही मासिक पाळी म्हणजे जणू काही पापच, असा दृष्टीकोन बऱ्याच लोकांचा असतो. पाळी सुरु असताना बाईला स्वयंपाक घरात जायला बंदी असते. देवाचे स्तोत्र म्हटले तरी हटकले जाते. पाळी सुरु असताना बाळंतणीला भेटायला जावू नये, अशा असंख्य अशास्त्रीय अंध्दश्रध्दा आजही आपल्याकडे आहेत. घरातील मंगलकार्यावेळी देखील घरातील स्त्रीच्या पाळीची तारीख विचारात घेतली जाते. पाळी म्हणजे विटाळ, अडचण, घरातल्या वस्तूंना हात लावण्याची मुभा न देण्याऱ्या कुटुंबामध्ये बाईने ह्याच दिवसात कमावलेला पैसा मात्र कसा चालतो हो? सुनेच्या मासिक पाळीच्या तारखांवर लक्ष ठेवून असलेल्या काही वयस्कर स्त्रिया घरात पाळणा हालण्याची मात्र आतुरतेने वाट पहात असतात. अशा अनेक जुन्या अंध्दश्रध्दा व रुढी परंपरामध्ये स्त्रीला अडकवून ठेवले जाते. आणि ह्याच परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या अंध्दश्रध्देवर स्त्रीचा इतका विश्वास बसलेला असतो की, आपल्यावरच अन्याय होत आहे, याची जाणीव देखील त्यांना होत नाही.

खरं तर आजच्या काळात स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरूषाला लाजवेल अशी कामगिरी करून दाखवित आहे अशावेळी ही अंध्दश्रध्दा का निर्माण झाली आणि त्याला भारताची परंपरा म्हणून कोणी मानले ? याचे उत्तर त्यांना विचारले तर तेही त्यांना सांगता येत नाही. फक्त पूर्वापार चालत असलेल्या चुकीच्या रुढी परंपरा त्यांच्या मुळ कारणांचा खुलासा न करता त्या पुढच्या पिढीने चालू ठेवल्या आणि त्यात स्त्रीला अडकवून ठेवले आहे. आणि त्याला भारतीय परंपरेचे नाव दिले आहे. मात्र आपली भारतीय परंपरा ही नेहमीच स्त्रीयांचा आदर करणारी आहे. परंतु काही विकृत व पुरूषी अहंकार असणाऱ्या लोकांनी हे चार दिवस धर्माच्या नावाखाली अपवित्र बनविले आहे.

 

शब्दांकन
कोमल बापू पाटील
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.