जगणं : चाकोरीबद्ध बंधांतून मुक्त होतांना

0

लोकशाही विशेष लेख 

 

जन्म ते मृत्यू या प्रवासात प्रत्येक जण आपापल्या परीने परिस्थितीचे पाश तोडत जगण्याचा प्रयत्न करतो. पण ते पाश तोडताना वाटेला येणारा संघर्ष, तिरस्कार, लढा हा सगळ्यांनाच सोसवतो असं नाहीच. या खडतर वाटेनं बिकट परिस्थितीला मलमली वस्त्रासारखं स्वतःभोवती गुंडाळून आपलंच आहे, फक्त आपलचं.. असं म्हणत स्वतःला जपत लढावं लागतं. चौकटी भेदून मनसोक्त जगायला प्रत्येकाला शक्य होत नाही, ना सगळ्यांमध्ये हिंमत असते. बहुतांश आपल्या खिडकीतून दिसत तेवढंच आकाश हेच आपलं विश्व मानत चौकटीत जगणारे सामान्य लोकचं जास्त दिसतात आणि बोटावर मोजण्याइतके अपवाद असतात ज्यांना समजत ही चौकट ज्यात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत जगायला शिकवलं जातं.

ती ‘जगण्याची चौकट’ नव्हे तर फक्त आणि फक्त ‘गुलामीची चौकट’ आहे. ज्यात माणसाला स्वतःचे विचार, बुध्दी, मनगटातील ताकद ह्यापासून अनभिज्ञ ठेवून फक्त नी फक्त व्यवस्थेचा गुलाम बनवायला शिकवलं जातं, ज्यात जितेपणीच माणूस मरतो. आणि मग हे अपवाद स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा आयुष्याचे पाश तोडायला ठामपणे उभे राहतात. अख्ख जग वेड्यात काढत त्याहीपेक्षा जास्त ज्यांना आपली माणसं म्हटली जातात ती देखील आपल्याला वेड्यात काढतात. तेव्हाही ते निरंतर झटतात, हे बंधन झुगारण्यासाठी, जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी लढतात, रडतात, स्वतःच हसू करत स्वःतालाच हसतात, एकटेच चालतात, धडपडतात, एकाकीपणाला सामोरे जातात, उठतात परत लढतात पण तरी.. पण तरी, जगलो ते लढून जगलो चाकोरीने नाही…

दिवसाअंती हेच समाधान घेऊन आयुष्यातला कटू सत्याला रोज रात्री कुशीत घेऊन झोपतात. हाच फरक असतो, जिवंतपणी गुलामी स्वीकारून जितेपणी मरण्यात.. आणि जितेपणी संघर्षाची अटळ वाट स्वीकारून मरण यातना भोगून हा काळ सरल्यानंतरदेखील जिवंत असण्यात..!

चंचल संगीता सुनिल
८४५९२०१०९३

Leave A Reply

Your email address will not be published.