दिवावासियांचा मडकी फोडत पाणीटंचाईविरोधात संताप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे : दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात भाजपाने महापालिका मुख्यालयावर आज पाणी हक्क मोर्चा काढला. या मोर्चात दिवावासियांनी मडकी फोडून पाणीटंचाईविरोधातील सत्ताधारी व महापालिका प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त केला. तसेच पाणीटंचाईवर तोडगा न काढल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात प्रदेश सचिव संदिप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, महिला आघाडीच्या प्रमुख मृणाल पेंडसे, मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, ज्योती राजकांत पाटील यांच्यासह शेकडो दिवावासिय सहभागी झाले होते.

दिवा परिसरातील पाणीटंचाईविरोधात यापूर्वी दिव्यात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, पाणीटंचाई कायम राहिल्यामुळे नितीन कंपनी जंक्शनहून महापालिका मुख्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला. पाणी आमच्या हक्काचे, पालकमंत्री हाय हाय, पाणीटंचाई न सोडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा नागरिकांकडून देण्यात आल्या. दिवा बोलणार, असे फलक झळकवित पाणीटंचाईच्या निषेधार्थ मडकी फोडून संताप व्यक्त केला. मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यावेळी टंचाईग्रस्त भागासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले.

दिवावासियांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. त्यासाठी भाजपाकडून सातत्याने लढा दिला जाईल, अशी माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. तर दिव्यातील नळपाणी योजना व रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, मुलभूत पाण्याची सुविधा सोडविण्यात अपयश आले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची राज्यातील सत्ताधाऱ्यांची भावनाच नसून, महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईवर जनतेचा अंत पाहू नये. यापुढील काळात हा प्रश्न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला. अनधिकृत बांधकामांना पाणी मिळत असताना, रहिवाशी पाण्यापासून वंचित आहेत, याबद्दल श्री. डावखरे यांनी टीका केली.

आता मडकी फोडून आंदोलन केल्याने कधीतरी राज्यातील सत्ताधारी व प्रशासनाचे डोके ठिकाणावर येईल, अशी अपेक्षा आहे. तहानलेल्या दिव्यासाठी आणखी लढा तीव्र केला जाईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. दिव्यातील जनतेसाठी बांधलेले ई-टॉयलेट तोडले गेले. जनतेविषयी आस्था नसल्याची टीकाही श्री. केळकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.