नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक भरतीचे पोर्टल सुरू होईल. शिक्षक भरतीसाठी बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शिक्षकांच्या समायोजनाचा टप्पा सुरू आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राज्यासह उत्तर महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षक निवृत्त झाले. मात्र, नव्याने शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक दिवसांपासून सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी विधानपरिषदेत आमदार दराडे यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, की प्रत्येक संस्थेने बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातून पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत. हा टप्पा पूर्णत्वास गेला, की १५ दिवसांत जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू होणार आहे. जाहिरात निघाली, की पात्र विद्यार्थ्यांना चॉईस दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.