तडाखा : जळगावसह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले !

0

भडगाव तालुक्यात गारपीट ; केळी बागांसह कापसाचे नुकसान, गारठा वाढला

जळगाव : – शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रात्री आठ वाजेनंतर पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळला . तसेच भडगाव ,चाळीसगाव तालुक्यात गारपीट झाली . या पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी केळी आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला . दरम्यान वातावरणात या अवकाळी पावसामुळे गारठा वाढला आहे.

जळगाव शहरात धुव्वाधार

जळगाव शहरात सायंकाळी रिमझिम पावसाळा सुरुवात झाली. मात्र रात्री आत वाजेनंतर पावसाने जोर धरल्याने पाऊस चांगलाच कोसळला . रविवार असल्याने फारशी वर्दळ शहरात नसली तरी अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळते. रात्री अडीच वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. तर आज सोमवार सकाळी ६ ते ७ यावेळेत पावसाने पुन्हा हजेरी लावली .

जामनेरात रिमझिम सारी कोसळल्या
जामनेर तालुक्यात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणात गारवा असल्याने दिवसभर हुडहुडी जाणवत होती. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.  या बेमोसमी पावसामुळे शेतातील कपाशी ओली होणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. या वातावरणामुळे रोगराईला आमंत्रण मिळणार असल्याचे मत तज्ज्ञ शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

पाळधी येथे पाऊस

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे रात्री दमदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट व पावसाला सुरुवात होताच वीज गुल झाली होती. दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कपाशीलापाणी भरणे वाचणार असून ज्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची लागवड केली असेल, त्यांचाही फायदा होईल.

पारोळ्यात पावसामुळे नागरिकांची तारंबळ
पारोळा शहरात रविवारी आठवडे बाजार होता. तर सायंकाळी अचानक बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. २६ रोजी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ग्रामीण तसेच शहरातील नागरिकांनी बाजार करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र आचनक बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने दुकानादारांसह नागरिकांची तारांबळ उडाली. तासभरापासून रिपरिप पाऊस सुरु होता नंतर पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

चोपड्यात विजांच्या कडकडाटसह पाऊस
चोपडा शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने २६ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हजेरी लावली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यात पावसाने हजेरी लावल्याने गारव्यात वाढ झाली आहे. रब्बी पिकांना या पावसामुळे फायदा होईल तर उभ्या असलेल्या कापसाचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी नितीन निकम यांनी सांगितले.तालक्यात सर्वत्र कमी-अधिकप्रमाणात पाऊस झाला असून कोठेही नुकसान झाले नसल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले.

रंडोल तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

एरंडोल येथे सायंकाळी सुमारे पावणेसात वाजता मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. जवळपास पाऊण तास मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गत २ ते ३ दिवसांपासून परिसरात दिवसभर आभ्राछदित वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे गहू, हरबरा पिकास फटका बसण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, नुकतीच गहू, हरबऱ्याची पेरणी केलेल्या पिकास या पावसाचा लाभ होईल, असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

सावदे येथे गारपीट

भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर अनेक ठिकाणी गारपीट झाली. कजगाव येथून जवळच असलेल्या सावदे येथे सायंकाळी मसळधार पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कजगावात अवकाळी सरी

कजगाव येथे सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आज रविवारचा बाजार असल्याने अचानक पडलेल्या अवकाळी सरींमुळे सर्वांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्यानंतर विजेची बत्ती काही वेळ गुल झाली होती.

भडगावसह परिसराला पावसाने झोडपले
भडगाव शहरासह तालुक्यात दमदार पाऊसासह गारपीट झाल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी उध्वस्त झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे गहू, हरभरा, केळीसह फळबागांची मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. भडगावसह तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.