बोर्डाचा निर्णय! दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकासाठी बाह्य परीक्षक नसणार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे. कोरोनामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात बहुतेक दिवस शाळा बंद राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती खूपच कमी राहिली. या पार्श्‍वभूमीवर प्रात्यक्षिक परीक्षेवेळी विद्यार्थ्यांवर कोणतेही दडपण येऊ नये म्हणून प्रात्यक्षिकासाठी बाह्य परीक्षक नसणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पहिल्यांदा बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर 4 मार्चपासून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून सुरु होईल. त्यानंतर 15 मार्चपासून लेखी परीक्षेला सुरवात होईल.

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने ज्या शाळेत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या 15 अथवा त्याहून अधिक आहे, त्याठिकाणी परीक्षेचे एक उपकेंद्र असणार आहे. लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 ते 30 मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. दरम्यान, दरवर्षी इतर शाळांमधील बाह्य परीक्षकांना बोलावून त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते.

मात्र, कोरोनामुळे यंदा बहुतेक विद्यार्थ्यांना शाळेत वर्षभर जाता आले नाही. बाह्य परीक्षांसमोर प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्यास त्यांच्यावर दडपण येऊ शकते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बाह्य परीक्षकांऐवजी शाळेतील विषय शिक्षक व अन्य विषयाच्या एका शिक्षकावर त्या परीक्षेची जबाबदारी सोपविली जाणार आहे. एका शाळेत एका विषयासाठी एकच शिक्षक असल्यास त्या शिक्षकाला बाह्य व अंतर्गत परीक्षक म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, असेही बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांवर दडपण नको

कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कमी राहिली आहे. त्यामुळे बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेवेळी विद्यार्थ्यांवर कोणतेही दडपण राहू नये, या हेतूने यंदा दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षक नसतील. शाळेतील विषय शिक्षक व अन्य एका शिक्षकावर बाह्य व अंतर्गत परीक्षक म्हणून जबाबदारी राहील.

– शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

दहावी-बारावी परीक्षेचे नियोजन

दहावीचे विद्यार्थी – 16.23 लाख

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 25 फेब्रुवारीपासून

बारावीचे विद्यार्थी – 14.70 लाख

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 14 फेब्रुवारीपासून

 

Leave A Reply

Your email address will not be published.