जळगावच्या श्रीराम रथोत्सवाची महती; १४९ वर्षांची परंपरा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

कान्हदेशातील वारकरी सांप्रदायाचे थोर व जलग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष श्री सद्गुरू अप्पा महाराजांनी हिंदू धर्मातील अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त भव्य व दिव्य श्रीराम रथोत्सवास प्रारंभ केला. कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून श्रीराम वहनोत्सव होत असतो. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जात आहे. यात घोडा, हत्ती, वाघ, सिंह, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी दहा दिवस वहने निघतात. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन, गोपाळकाल्याचे कीर्तन होऊन अन्नसंतर्पणाने उत्सवाची होते. यामुळे जळगावनगरीत पंधरा दिवसांची दिवाळी व आनंदोत्सव साजरा होत असतो.

 अशी सुरू झाली परंपरा 

श्रीराम मंदिर संस्थानचे प्रथम गादिपती मूळ सत्पुरुष सदगुरू श्री आप्पा महाराज हे मेहरूण तलावाजवळ वटवृक्षाखाली  ध्यानस्थ बसलेले असताना, त्यांना त्या अवस्थेत वैशाख वद्य दशमी श्री संत मुक्ताई तिरोभूत सोहळा दिनी साक्षात आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा  साक्षात्कार झाला. त्यांनी दृष्टान्त देऊन आषाढीस पंढरीची पायी वारी व कार्तिक शु प्रबोधीनी एकादशीस वहन व श्रीराम रथोत्सवाची प्रेरणा श्री आप्पा महाराजांना दिली. त्या वर्षापासून म्हणजे शके १७९४ इसवी सन १८७२ पासून आजतागायत १४९ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा श्रीराम रथोत्सव अद्ययावतपणे सुरू आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुनश्‍च मंदिरात नेले जातात. कार्तिकी शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रासक्रीडा असते. गोप-गोपिकांच्या मूर्ती वहनावर सजविल्या जातात.

वहनाला ठिकठिकाणी पानसुपारी असते. पानसुपारी म्हणजे यजमानपद. त्या दिवशी देव आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात. त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. देवांच्या वतीने मंदिराचे विद्यमान गादीपती श्रीमहाराज तो सन्मान स्वीकारतात. भजन- भारुड होऊन पानसुपारी’ची सांगता होते. जळगावच्या रथोत्सवासाठी शहर व परिसरच नव्हे; तर जिल्हाभर व महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतूनही लोक दर्शनासाठी येतात. व नवस बोलत असतात  दिवाळीसाठी जळगावच्या माहेरवाशिणी रथोत्सवानंतरच सासरी जातात. थोर परंपरा लाभलेला श्रीरामरथोत्सव सन १८७२ मध्ये सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काळात रथोत्सवाचे स्वरूप वेगळे होते. त्या काळात मातीच्या रस्त्यावरून रथ उत्साहाने ओढला जात होता. तसेच रात्री मशाल, पणत्या लावल्या जात होत्या. पूर्वी म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी जुन्या गावातच रथ फिरत असल्याने मार्गही लहान होता.

हिंदू- मुस्लिम एकोप्याचे दर्शन

श्रीराम रथोत्सवात हिंदू- मुस्लिम समाजबांधवांचे एकोप्याचे दर्शन लाभते. कारण, श्रीराम रथ परिक्रमा करीत असताना संत लालखाँ मियाँ यांच्या समाधीजवळ येतो व थोडा वेळ थांबतो. कारण श्री संत आप्पा महाराज व लालखाँ मियाँ यांचा स्नेहभाव खूप जवळचा होता आणि तो खानदेशात परिचितदेखील आहे. संत लालखाँ मियाँ यांच्या समाधीवर रथोत्सवाचे सेवेकरी तर्फे पुष्पचादर अर्पण केली जात असते; तर मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने रथोत्सवातील मान्यवरांचा सत्कार केला जातो. मुख्य म्हणजे श्रीराम रथावर पुष्पवर्षावदेखील केला जात असतो.

रथाचा मार्ग  

श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हेवाडा, डॉ. आंबेडकरनगर, चौधरीवाडा, तेली चौक, राम मारुती पेठ, मंदिराच्या मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, शिवाजी रोड, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौकमार्गे सराफ बाजारातील श्री भवानी मंदिर, श्री मरीमाता मंदिर, भिलपुरामार्गे भिलपुरा चौक, दधिची चौक, बालाजी मंदिरामार्गे रात्री १२ वाजता रथ चौकात परत येतो.

रामरायांची चैतन्यमयमुर्तीस पालखीत विराजित करून रामनामाच्या जयघोषात सनईच्या मंगल स्वरात श्रीराम मंदिराचे महाद्वारात येते तेथे श्री अप्पा महाराजांच्या वंशज सौ सुनबाईंचे हस्ते रामरायांना औक्षण करून दिप ओवाळून रामराया पुनश्च गर्भगृहात सिंहासनावर विराजित होतात.

श्री संत निळोबा रायांचा  पुर्ण केला पुर्ण केला । पुर्ण केला मनोरथ । घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू । हा अभंग व  उभारीला हात जगी जाणविली । देव बैसले सिंहासनी । आल्या याचकाहो  पुरे धणी । हा श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग होऊन आरती होते.

उपस्थित सर्व रामभक्तांना प्रसाद व श्रीफळ संस्थान कडून विद्यमान गादीपती श्री मंगेश महाराज यांचे शुभहस्ते दिला जातो.  असा हा पंधरा दिवस चाललेला उत्सवाचा मुख्य व मोठ्या आनंदाचा प्रबोधिनी एकादशीचा अकरावा सुदिन मोठ्या थाटामाटात  सादर संपन्न होतो. पुढील चार दिवसात रासक्रीडेचे वहन, तुळसी विवाह, फुलांचा महादेव इ. कार्य होऊन त्रिपुरारी पौर्णिमेस श्री संत सोपानदेवांचे जयंती दिनी श्री गोपाळकाल्याच्या कीर्तन व अन्नसंतर्पणाने पंधरा दिवस चाललेल्या श्रीराम रथोत्सवाची सांगता होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.